पालिकेच्या थकबाकी वसूलीसाठी बँक खाते सील करण्याबाबतच्या हालचाली
सातारा नगरपालिकेमध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी न भरलेले पाचशेहून अधिक थकबाकीदार आहेत. या मिळकतदारांना गेल्या आठ दिवसांपूर्वी जप्ती वॉरंट नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, परंतु तरीही अनेकांकडून थकबाकी जमा करण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही. अशा थकबाकीदारांवर कायद्याचा बडगा वापरुन कसल्याही परिस्थितीत वसुली व्हावी, हा हेतू ठेवून नगरपालिका प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. शहरातील गॅस एजन्सी आणि जिल्हा पुरवठा अधिकार्यांना पत्र पाठवून मिळकतदारांचे बँक खाते आणि मोबाईल नंबर मागविले आहेत. त्यांच्याकडून ही यादी आल्यानंतर संबंधित थकबाकीदारांना सुरुवातीला मोबाईलवर थकबाकी किती आहे, यासंदर्भात ’एसएमएस’ पाठविण्यात येणार आहे.
याकडेही दुर्लक्ष केल्यास बँकखात्यातील व्यवहार थांबवून सील करण्यात येणार आहेत. थकबाकीदारांची आर्थिक कोंडी झाल्यानंतर साहजिकच थकबाकी जमा होईल, अशी अपेक्षा वसुली विभागाला आहे. त्यामुळे थकबाकीदारांची सगळया बाजूने कोंडी कशी करता येईल, यासाठी कायदेतज्ज्ञांचाही सल्ला घेतला जात आहे. आतापर्यंत कनेक्शन आणि घर सील करणे, यावरच कारवाई मर्यादित होती, परंतु आता ही कारवाई तीव्र होणार आहे.
ही वसुली मोहीम सुरु झाल्यानंतर केवळ आठ दिवसांत तब्बल 25 लाख रुपये नगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. ही मोहीम आणखी तीव्र होणार असून वृत्तपत्रामध्येही थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षापासून आतापर्यंत एकूण 15 कोटी 20 लाख रुपये वसुली मोहिमेत जमा झाले आहेत.