Breaking News

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक-वाचक बँक

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : पहिली ते बारावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी या हेतूने पात्र सदस्यांची नोंदणी असलेली लेखनिक व वाचक बँक तयार करण्यात येणार आहे. लेखनिक व वाचक सेवा देण्यासाठी उपक्रम राबवला जात आहे. 
पहिली ते बारावीपर्यंतच्या विशेष गरज असणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये  द्यावयाच्या सोयी सवलतींबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय काढला आहे. ज्या विद्यार्थ्यांना लेखनिक व वाचकांची आवश्यकता आहे. अशा विद्यार्थ्यांना लेखनिक व वाचक म्हणून शालेय शिक्षण घेत असलेले सामान्य विद्यार्थी प्रामुख्याने उपलब्ध करून घेता येतील. शालेय सामान्य विद्यार्थी लेखनिक व वाचक म्हणून उपलब्ध न झाल्यास वयाने प्रौढ असलेले लेखनिक व वाचक पुरविता येणार आहेत.
विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान लेखनिक व वाचक नाही, म्हणून कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा, तालुका शाळास्तरावर लेखनिकासह वाचकांची सेवा निरंतरपणे उपलब्ध व्हावी याकरीता परिसरातील इच्छुक सदस्यांची नोंदणी असलेली बँक तयार करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व अध्ययन अध्यापन प्रक्रियेकरीता सेवा उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनस्तरावरून निर्णय घेण्यात आला आहे. लेखनिक व वाचक बँक तयार करण्यासाठी संबंधित परिसरातील इच्छुक शालेय सामान्य विद्यार्थी, प्रौढ व्यक्तींना विशेष गरज असणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्यांचे लेखनिक व वाचक होण्याबाबत जिल्हा, तालुका, शाळास्तरावर आवाहन करण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांचे व प्रौढ व्यक्तींचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक मूल्यमापन व मूल्यांकनातील समस्या दूर करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे ही  लेखनिक व वाचक बँकेची ध्येये आहेत. लेखनिक-वाचकांची आवश्यकतेनुसार उपलब्धता, विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढविणे, अध्ययन प्रक्रियेतील अडथळा दूर करणे, मूूल्यांकनावेळी सुलभपणे आवश्यक असणार्‍या सोयी सुविधांची उपलब्धता करणे ही उद्दिष्टे आहेत. लेखनिक वाचक म्हणून शालेय शिक्षण घेत असलेल्या सामान्य विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे, इच्छुक विद्यार्थ्यांचे नोंदणी अर्ज,  संमतीपत्र भरून घेण्यात यावे, लेखनिक व वाचक नोंदणी करताना लेखनिक विद्यार्थी असल्यास त्यांच्या पालकाचे संमतीपत्र घेण्यात यावे, लेखनिक व वाचकास इयत्ता, विषय, कालावधी, वेळ, दिव्यांग विद्यार्थी याबाबत पूर्वकल्पना देण्यात यावी. लेखनिक-वाचकास परीक्षेच्यावेळी एक महिना अगोदर पत्राद्वारे सूचना देऊन खात्री करून द्यावी, लेखनिक व वाचकाची विशेष गरज असणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा ही  एकाच कालावधीत असणार नाही याबाबत खात्री करावी. लेखनिक व वाचक म्हणून नोंदणी केलेले विद्यार्थी, प्रौढ व्यक्तींनी  परीक्षेदरम्यान अपरिहार्य कारणामुळे नकार दिल्यास अथवा उपस्थित राहू न शकल्यास पर्यायी व्यवस्था सुनिश्‍चित करण्यात यावी. अशा मार्गदर्शक सूचनांचा अवलंबक करणे महत्त्वाचे आहे.