Breaking News

चिखलीत काँग्रेस व भाजपात लढत होवून भाजपाची सरशी...

बुलडाणा, दि. 24 - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होवू घातलेल्या निवडणूकीत चिखलीमध्ये काँग्रेस व भाजपामध्ये चुरशीची लढत होवून त्यामध्ये भाजपाची सरशी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. काँग्रेसचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या विजयाच्या घोडदौडेला थांबविण्यात भारतीय जनता पक्षाने यश मिळविले आहे. चिखली नगरपालिकेत नगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ.प्रिया कुणाल बोंद्रे विराजमान झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही काँग्रेसला हद्दपार करण्यात भाजप पक्षश्रेष्ठ तथा नेत्यांचे प्रयत्न यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेली जिल्हा परिषदेवर आता भाजपाने जोरदार मुसंडी मारत यश मिळविले आहे.
उंद्री जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या सौ. श्‍वेता विद्याधर महाले  3131 मताधिक्य घेवून विजयी झाल्या आहेत. अमडापूर-उंद्री गणातील भाजपाचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. तर इसोली जि.प. व पं.स. गणातून काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. चिखली तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे जितेंद्र कलंत्री 2658 मते घेवून विजयी झाले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राम डहाके यांना पराभूत केले आहे. राम डहाके यांना फक्त 1561 मते मिळाली. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जि.प. उमेदवार कोकिळा सुरेंद्र खपके यांनी 3350 मते घेवून विजय मिळविला. त्यांनी भाजपाचे बबनराव राऊत यांना पराभूत केले. राऊत यांना 2697, शिवसेनेचे दामोधर येवले 1354, भारिपचे वासुदेव बोरकर यांना 375 मते मिळाली.