Breaking News

कृष्णा नदीत बुडून युवकाचा मृत्यू

वाई, दि. 24 (प्रतिनिधी) : वाई तालुक्यातील मेणवली येथे कृष्णा नदीत पोहताना पाण्यात बडून गोडवली-पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील रोहन रतन मोरे (वय 30) या युवकाचा मृत्यू झाला. त्याचा भाऊ रोहित व स्नेहदीप हणमंत वाघमारे (26, रा. विक्रोळी, मुंबई) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाचगणीतील घाटजाई देवीच्या यात्रेसाठी गोडवली येथील रतन विष्णू मोरे यांच्याकडे मुंबई येथील बहिणी व इतर नातेवाईक आले होते. यात्रा पार पडल्यानंतर दर वर्षीप्रमाणे मोरे कुटुंबीय नातेवाईकांसह मेणवली येथे फिरायला आले होते. यामधील तिघेजण पोहण्यास उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने रोहित मोरे व स्नेहदीप वाघमारे बुडू लागले. हे पाहून त्यांचा भाऊ रोहन त्यांना वाचविण्यासाठी गेला. दोघांना वाचविताना खोल पाण्यात शिरल्याने रोहन बुडाला. गोंधळ झाल्याने खुदबुद्दीन अतनूर व सैफान मुल्ला या युवकांनी पाण्यात उतरून रोहित व स्नेहदीप यांना पाण्यातून बाहेर काढले. विशाल तावडे याने रोहन याचा शोध घेतला. अर्ध्या तासाने तो सापडला. तिघांना तातडीने वाईच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र त्यापूर्वीच रोहन याचा मृत्यू झाला होता. रोहित व स्नेहदीप या दोघांची प्रकृती ठिक आहे. रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. मोरे यांचे नातेवाइक मेणवली परिसरात फिरून मुंबईला परतणार होते. रोहन बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत होता. वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. बेसुमार वाळू उपशामुळे मेणवली घाट परिसरातील नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून, यामुळेच ही दुर्घटना घडल्याची परिसरात चर्चा आहे.