Breaking News

महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र 24 ते 26 रोजी सुुरु

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : थकीत वीजबिलांची वसुली करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात महावितरणकडून मोहीम सुरु केली असून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे दि. 24 ते 26 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत.
वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिल न भरणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे चालू वीजबिलांचा किंवा थकबाकीचा भरणा करता यावा, यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा या पाच जिल्ह्यांच्या शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजे 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत सुरू राहणार आहेत.
थकबाकीदारांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केंद्रे तसेच घरबसल्या ऑनलाईन पेमेंट करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.