Breaking News

सोयाबीन अनुदान प्रस्तावासाठी बाजार समितीत शेतकर्‍यांची गर्दी

लातूर (प्रतिनिधी), दि. 30 - बाजार समितीत विक्री केलेल्या सोयाबीनला प्रति क्विं़ 200 रुपयांचे अनुदान देण्याचे राज्य शासनाने जाहीर करुन 28 जानेवारी ही शेवटची मुदत दिली होती़ त्यामुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्ताव सादर करण्याच्या शनिवारी शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती़ शनिवारपर्यंत जवळपास 24 हजार शेतकर्‍यांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले आहेत़
1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या शेतकर्‍यांना प्रति क्विं़ 200 रुपयांचे अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे़ त्याचा लाभ 25 क्विं़पर्यंत शेतकर्‍यांना मिळणार आहे़ शासनाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत शेतकर्‍यांनी प्रस्ताव सादर करण्यास सुरुवात केली होती़
दरम्यान, प्रजासत्ताकदिन व अमावस्येची सुटी आल्याने लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीसह अन्य बाजार समित्यांनी या अनुदानाच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नयेत, म्हणून या सुटीच्या दिवशीही प्रस्ताव घेणे सुरु ठेवले होते़ लातूर बाजार समितीत बुधवारपर्यंत 15 हजार प्रस्ताव दाखल झाले होते़ शनिवारी अखेरच्या दिवशीपर्यंत जवळपास 24 हजार शेतकर्‍यांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत़ शनिवारी तर शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती़ त्यामुळे एकाच दिवसात 4750 प्रस्ताव दाखल झाल्याचे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी सांगितले़.