Breaking News

सामाजिक परिवर्तन युवकांच्या माध्यमातूनच शक्य ः गोडसे

अहमदनगर, दि. 14 - महापुरुषांच्या कार्याचे अवलोकन करुन त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. सामाजिक परिवर्तन युवकांच्या माध्यमातूनच शक्य  आहे. युवकांनी रुढी, परंपरा झुगारुन सक्षम भारत घडविण्यासाठी सामाजिक उपक्रमात आपले योगदान देण्याचे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक  बाबाजी गोडसे यांनी केले. 
भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र व स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त नगर तालुक्यातील  निमगाव वाघा येथील मिलन मंगल कार्यालयात आयोजित युवा सप्ताहाच्या उद्घाटना प्रसंगी गोडसे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त लेफ्टनंट कर्नल  (नौसेना) सदाशिव भोलकर, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, जिल्हा बँकेच्या विद्या तन्वर, अ‍ॅड.भानुदास होले, संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, शासनाचा जिल्हा  आदर्श युवा पुरस्कार विजेते अ‍ॅड.महेश शिंदे, शाहिर कल्याण काळे, कान्हू सुंबे, जिल्हा रुग्णालयाचे शिवाजी जाधव आदि व्यासपिठावर उपस्थित होते.
 पुढे बोलताना गोडसे म्हणाले की, माणसातील माणुसपण जीवंत राहण्यासाठी सर्वस्वी त्याग करुन सामाजिक कार्य करणार्या महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी  साजरी केली जाते. स्वराज्यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवबा घडविले, तर  अनेक युवा मावळे एकवटून क्रांती झाली. युवकांद्वारे बदलाचे वारे वाहत आहे. नेहरु  युवा केंद्राच्या वतीने कोणताही शासकिय निधी नसताना रोखमुक्त व्यवहाराचे 350 कार्यशाळा जिल्ह्यात युवकांच्या माध्यमातून राबविण्यात आल्याचे त्यांनी  सांगितले. प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादनाने व तुलसीच्या रोपाला पाणी टाकून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  प्रास्ताविकात पै.नाना डोंगरे यांनी संस्थेच्या वतीने चालू असलेल्या शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक कार्याची माहिती दिली.