Breaking News

मुकुंदनगर येथील पाण्याची टाकी सुरु करण्याची मागणी

अहमदनगर, दि. 14 - मुकुंदनगर येथे पाण्याची टाकी बांधून चार वर्षे उलटली असताना सदर नवीन पाण्याची टाकी सुरु करुन, पाणी पुरवठा फेज-2 योजना  त्वरीत कार्यान्वीत करण्याच्या मागणीचे निवेदन पीस फाऊंडेशनच्या वतीने मनपा उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांना देण्यात आले. सदर प्रश्‍नाची दखल न घेतल्यास  दि.26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनी मनपा समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी आर्किटेक अर्शद शेख, अशोक सब्बन, हारुण राजे, ईस्माइल  शेख, सलिम सहारा, अन्सार सय्यद, ईस्माइल पठाण, हनिफ शेख, खालिद शेख, वसिम शेख, इम्तियाज शेख आदि उपस्थित होते.
मुकुंदनगर येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन नवीन पाणीपुरवठा योजना फेज-2 चे काम सुरु करण्यात आले. या योजनेला सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी  झालेला असताना देखील ही योजना अद्यापि कार्यान्वीत झालेली नाही. फेज-2 अंतर्गत या भागात नवीन पाण्याची टाकी पुर्ण होवून देखील 4 वर्षे झाले आहे.  तसेच या भागात पाईपलाईनचे काम देखील पुर्ण झालेले असताना, या भागात राहणार्या 50 हजार नागरिक या योजनेच्या सुविधेपासून वंचित आहेत. या योजनेद्वारे  संपुर्ण मुकुंदनगर भागातील पाण्याचा गंभीर प्रश्‍न सुटणार आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करुन 4 वर्षापासून ही योजना धूळखात पडल्याने देखभाल व दुरुस्ती अभावी  सदर योजनाच निष्फळ होण्याची शक्यता आहे. यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
कायदा 1949 नुसार महापालिकेवर नागरिकांना स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाणी पुरवण्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली असताना, प्रशासनाच्या दप्तर  दिरंगाई व हलगर्जीपणामुळे संपुर्ण फेज-2 योजनाच निष्फळ ठरणार आहे. एक्सप्रेस फिडर व उर्वरित कामे तातडीने पुर्ण करुन पाण्याची टाकी कार्यान्वीत  करण्याची मागणी पीस फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.