Breaking News

माणसातील चांगुलपणा म्हणजेच माणुसकीची भिंत : सौ. वेदांतिकाराजे भोसले

सातारा, दि. 15 (प्रतिनिधी) : जनसेवचा हीच खरी ईश्‍वरसेवा आहे. आजच्या तत्रज्ञानाच्या, धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात माणसातील माणुसकी हरवत  चालली आहे. प्रत्येकामध्ये कुठेतरी चांगुलपणा लपलेला असतो. मात्र त्या चांगुलपणाला वाव मिळत नाही. आज अनेक ठिकाणी माणुसकीची भिंत या उपक्रमाद्वारे  गोर- गरीबांना मदत केली जात आहे. या स्तुत्य उपक्रमला भरभरुन प्रतिसाद मिळत असून माणुसकीची भिंत या उपक्रमामुळे माणसातील चांगुलपणाचे दर्शन घडत  आहे, असे प्रतिपादन अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर वात्सल्या फौंडेशन, हॅपी पिपल्स ग्रुप आणि अजिंक्यतारा साखर कारखाना  यांच्या संयुक्त विद्यमाने नको असेल ते द्या आणि हवे असेल ते घेवून जा या माणुसकीच्या जाणीवेतून ममाणुसकीची भिंतफ या सामाजिक उपक्रमांतर्गत  कारखान्याचे ऊस तोडणी कामगार, बैलगाडी कामगार, त्यांचे कुटूंबीय आणि परिसरातील गोरगरीब लोकांना कपडे, चादरी, ब्लँकेटस, स्वेटर्स वाटप करण्यात  आले. यावेळी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, वात्सल्या फौंडेंशनचे सुधाकर भोसले, शशिकांत पवार,  अजय गायकवाड, प्रकाश जाधव, दत्तात्रय भोसले, उदय फडतरे, गणपत शिंदे, प्रविण कासकर, संजय जगदाळे, संदीप जाधव, प्रशांत मोरे, कुमार सोनवणे,  रंजीत सावंत, अजय शिराळ, मंगेश जाधव, राजेश भाटीया, सांबारे रावसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचा लाभ शेकडो ऊस तोडणी, बैलगाडी कामगार व त्यांच्या मुलांना झाला. ऐन कडाक्याच्या थंडीत या गोरगरीबांना दानशूर लोकांच्या मायेची उब  मिळाली असून असे उपक्रम सातत्याने राबवणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे माणसातील चांगुलपणाचे दर्शन घडत असून या माणुसकीमुळे गोर- गरीबांना  अत्यावश्यक मदत होत आहे. अजिंक्यतारा कारखाना स्थळावर उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीमुळे परजिल्ह्यातून रोजीरोटीसाठी आलेल्या बंधुभगिनी आणि  त्यांच्या बालगोपाळांना आवश्यक कपडे मिळाले. थंडीपासून त्यांचे रक्षण झाले. माणुसकीची भिंत या उपक्रमाचा सर्वांनी आदर्श घेवून आपआपल्या परीने या  उपक्रमाला मदत करावी, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.