Breaking News

दरवाढीच्या विरोधात कराड आरटीओ कार्यालयासमोर वाहनधारकांची निदर्शने

कराड, दि. 15 (प्रतिनिधी) : आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून वाहनांसाठी आकारण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या शासकीय फीमध्ये सरसकट 10 ते 15 पटीने  वाढ केल्याच्या निषेधार्थ येथील संकल्प चालक मालक प्रतिनिधी संघटना एमएच 50 च्यावतीने एक दिवसाचा लाक्षणीक संप करून शासनाच्या निषेधार्थ आरटीओ  कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दरम्यान प्रियदर्शनी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांनी या आंदोलनाला पाठींबा देवून पुढील लढाई एक दिलाने  लढण्याचे आवाहन केले.
परिवहन विभागाच्या माध्यमातून दुचाकी, चारचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांबाबत आकारण्यात येणार्‍या विविध प्रकारच्या शासकीय फीमध्ये 10 ते 15 पटीने वाढ  केली आहे. याचा निषेध करण्यासाठी येथील वाहन चालक-मालक प्रतिनिधी संघटनेने एक दिवसाचा लाक्षणीक संप केला. तसेच उपप्रादेशिक परिवहन  (आरटीओ) कार्यालयासमोर निदर्शने करत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. यावेळी अशोकराव पाटील, अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष भाऊ भिंगारे, प्रकाश  पाटील, बंडा जोते, शकील मोमीन, पिंटू जगदाळे, रईस पटवेकर, विजय मोरकळ, फिरोज मुलाणी, संभाजी शेलार, अमोल पाटील, राहूल काळे, गणेश देशमुख,  शाहु थोरात सर्व ड्रायव्हींग स्कूल व वाहन वितरक एजन्सीजचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते. शासनाच्या या निर्णयामुळे वाहन चालकांना आर्थिक  भुर्दंड सहन करावा लागणार आहे. यापुढील काळात सातारा जिल्ह्यातील सर्व वाहन चालक-मालक संघटना व प्रतिनिधींनी एकत्रीत येवून लढा देणे गरजेचे आहे.  आज एक दिवसाचा संप व निदर्शने झाल्यानंतर पुन्हा सर्व संघटनांना बरोबर घेवून शासनास निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती अशोकराव पाटील यांनी  दिली. शासनाने केलेली दरवाढ मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन पाटील यांनी केले.