Breaking News

नोटाबंदीमुळे केवळ गृहिणींजवळील काळा पैसा निघाला : सहकार राज्यमंत्री

जळगाव, दि. 03 - नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या गोठातून सातत्याने विरोध होताना दिसतो आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमीच विरोध करत असताना, आता शिवसेना नेते आणि राज्याचे सहकार मंत्री यांनीही पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीची खिल्ली उडवून घरचा आहेर दिला आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाचा सामान्य माणसालाच फटका बसला  आहे. 50 दिवस उलटले, तरी सामान्य माणसाचे दिवस बदलले नाहीत. काळा पैसा निघेल म्हटले  होते, मात्र तो कुठे निघाला, निघाला तो केवळ नवर्‍यापासून वाचविलेला घरगुती गृहिणींजवळील काळा पैसा, असे विधान करत शिवसेना नेते आणि राज्याचे  सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नोटाबंदीची खिल्ली उडवली आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाचा शेतकरी मजूर आणि सर्वसामान्य जनतेलाच फटका बसला आहे. हेच लोक बँकेच्या समोर रांगेत बघायला मिळाले. कोणत्याही बँकेचा  चेअरमन, आमदार, खासदार किंवा अन्य मोठी व्यक्ती बँकेच्या रांगेत उभी राहिली नाही., असेही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले. काळा माल असलेल्यांना  शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे भरता आले असते, तर त्यांचे तरी भले झाले असते, असे धक्कादायक विधानदेखील गुलाबराव पाटलांनी केले.