Breaking News

रत्नागिरीत रक्तचंदनाचा 10 कोटींचा साठा जप्त, सोफ्यातून तस्करीचा प्रयत्न

रत्नागिरी, दि. 03 - चिपळूणमध्ये वन विभागाने रक्तचंदनाचा मोठा साठा ताब्यात घेतला आहे. चिपळूणमध्ये टाकलेल्या धाडीत ताब्यात घेतलेल्या रक्तचंदनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल 10 कोटी रुपये आहे. तब्बल 600 नग रक्तचंदनाचे तीन ठिकाणाहून जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून विदेशात रक्तचंदनाची तस्करी  होत असल्याचं यातुन आता समोर येतं आहे. रक्तचंदनाच्या तस्करीसाठी आंतरराष्ट्रीय टोळीच सक्रीय आहे का, याचा शोध सध्या वन विभाग आणि चिपळूण पोलिसांनी सुरु केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून वन विभागाची झोप उडवली आहे ती म्हणजे चिपळूण येथे विविध ठिकाणी सापडणार्‍या रक्तचंदनाने. चिपळूण येथे वन विभागाला  रक्तचंदनाचा मोठा साठा गोवळकोट परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली आणि वन विभागाच्या टीमने गोवळकोट येथील आफ्रिन पार्कच्या अल्मदीना  अपार्टमेंटमध्ये एका गाळ्यात धाड टाकून पहिल्याच दिवशी 92 नग चंदन जप्त केले. यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्याच परिसरात विविध ठिकाणी  500 नग रक्तचंदन जप्त करण्यात आता वन विभागाला यश आलं आहे. याच रक्तचंदनाचा शोध घेत असताना वन विभागाला आणखी एका माहितीच्या आधारे  गुहागर बायपास रोडवर दुसर्‍या दिवशी धाड टाकण्यात आली आणि तब्बल 102 नग रक्तचंदन जप्त करण्यात आलं होतं.
विशेष म्हणजे हे रक्तचंदन सोफ्यांच्या आतमध्ये पॅकिंग करून ठेवण्यात आलं होतं. एका शेडमध्ये सोफा तयार करण्याचे काम सुरु होते. तीन ठिकणी टाकलेल्या  धाडीत वन विभागाला तब्बल 9 टनाचा माल जप्त केला गेला आणि याची किंमत भारतीय बाजारपेठेत दीड कोटी असली तरी आंतरराष्ट्रीय  तब्बल 10 कोटी  रुपयांच्या घरात जात असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.