Breaking News

भाजपा आणी धृपदराव सावळेंची परीक्षा! जिल्हा परिषद निवडणूकीत लागणार कस...


बुलडाणा, दि. 15 - बुलडाणा जिल्हयातील 9 नगर परिषदांच्या निवडणूकीची धूराळा अजुन पुरता खाली बसला नाही. न. प. निवडणूकीनंतरचे साद-पडसाद  अद्यापही राजकिय वर्तूळात उमटत आहेत. एकूणच राजकीय वातावरण सध्या देखील गरमागरम आहे. अश्या परिस्थीतीत बुलडाणा जिल्हा परिषदे सह पंचायत  समित्यांच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. नगर पालीका निवडणूकीत पाच वर्षापूर्वीच्या कामगिरीत भारतीय जनता पक्षाने बरीच सुधारणा केल्याचे  निकालावरुन दिसते. परंतु मुळातच शहरी पक्षा असा शिक्का बसलेल्या भाजपाचा खरा कस आगामी जिल्हा परिषद आणी पंचायत समितीच्या निवडणूकीत लागणार  आहे . ग्रामिण भागात भक्कम जनाधार असल्याचे दाखवणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांची नेमकी ताकद किती? याचे उत्तर या निवडणूकीतून  मिळणार असुन भाजपा देखील खेडयापाडयापर्यंत पोहचला काय हे सुध्दा स्पष्ठ होईल. म्हणूनच धृपदराव सावळे आणि भाजपा यांच्यासाठी  येणारी जि.प. व पं.स.  निवडणूक परिक्षेची घडी ठरणार आहे.
            भारतीय जनता पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या 9 नगर पालीका निवडणूकांमध्ये खामगाव, शेगाव,जळगाव जामोद, चिखली आणी देऊळगाव राजा  येथील नगराध्यक्षपदं पटकावली या शिवाय पक्षाच्या नगरसेवकांची संख्या सुध्दा बरीच वाढली मलकापूर नांदूरा, बुलडाणा आणि मेहकर पालिकांमध्ये मिळालेले  अपयश सुध्दा या यशाखाली झाकले गेले. पर्यायाने जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांची पक्षात कॉलर ताठ झाली . परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती  निवडणूकांमध्ये  हेच चित्र पहायला मिळेल अशी खात्री मात्र देता येत नाही. चिखली तालुक्याचेच उदाहरण द्यायचे झाले तर येथील जि.प. च्या 7 ही सर्कल मध्ये  भाजपाला कडवी झूंज द्यावी लागेल. चार महीन्यापूर्वी पक्षात आलेल्या सावळे यांनी काँग्रेस मधील आपले समर्थक  व चेले चपाटयांना तिकीट वाटपामध्ये झूकते  माप देण्याचा प्रयत्न निष्ठावंतांकडून खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत अलिकडे मिळाले आहेत. त्यामुळे धृपदराव सावळे यांना एका मर्यादेत राहूनच  आपला अधिकार बजावावा लागेल. या विरुध्द काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष आ. राहूल बोंद्रे यांचे वर्चस्व अबाधीत दिसते. 1-2 अपवाद वगळता काँग्रेसच्या तिकीट  वाटपात आ. बोंद्रे यांचाच वरचष्मा राहील असे दिसते.  या शिवाय चिखली मतदार संघाचे आमदार म्हणून गेल्या सात वर्षात त्यांनी खेडोपाडी केलेली विकासकामे  व सततचा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. त्या तुलनेत सावळे यांचेकडे सांगण्यासारखे व करण्यासारखे फारसे काही नाही. त्यामुळे केवळ नात्यागोत्याचे  राजकारण करुन त्यांना यश मिळणे कठीण आहे. चिखली तालुक्यात ग्रामिण भागात काँग्रेसचे वर्चस्व असुन पंचायत समिती ,कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकी  संस्था, ग्रामविकास सोसायटया या माध्यमातून पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. याचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो. भाजपाकडे असे नेटवर्क नसल्याने तिथे हा  पक्ष मागे पडतो. नगर पालिका निवडणूकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची झालेली प्रचंड जाहीर सभा, घरकुलासाठी साडेचार लाख रुपयाचे अनुदान मिळणार  असल्याचे आश्‍वासन यामुळे भाजपाला विजय मिळाला. मात्र ग्रामिण भागात मुख्यमंत्र्यांची सभा होणार नाही त्यामुळे तेथे देण्यासारखे ठोस आश्‍वासन भाजपाकडे  नाही. उलट नोटाबंदी मुळे शेतकरी , शेतमजूर व ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत. अशा परिस्थीतीत भाजपा कशी कामगिरी बजावणार यावरच पक्षाचा व जिल्हाध्यक्ष  सावळे यांचा पुढील राजकिय प्रवास अवलंबून आहे. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.