Breaking News

दगडाने ठेचून युवकाचा खून

बुलडाणा, दि. 15 - शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास मलकापूर रोडवर असलेल्या एस.टी. च्या विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या मागील परिसरात अज्ञात  युवकाचा मृतदेह सापडल्याने  शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलीसाांनी अवघ्या तिनच तासात मृतदेहाची ओळख पटविण्यासोबतच आरोपीलाही  अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अविनाश रामभाऊ मिसाळ वय 22 रा.बुलडाणा हल्ली मु.वाकोद (अजिंठा) हा तरुण काल शुक्रवार 13 जानेवारी  रोजी बुलडाणा स्थित आपल्या एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी आला होता. खुप दिवसांनी  गावी आल्याने आणि अंत्यसंस्काराचा विधी आटोपल्यानंतर  जुन्या मित्रांना भेटावे या उद्देशाने तो वार्ड क्र. 1 मध्ये गेला. मात्र खुप उशीर होवूनही तो परतला नाही. दरम्यान एस.टी. विभागीय कार्यालयाच्या पाठीमागील  मोकळ्या मैदानात एका युवकाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती रात्री 9 वाजेच्या सुमारास पोलिस स्टेशनला मिळाली. पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल  झाल्यानंतर  सदर युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असल्याचे पोलीसांना कळाले. ठेचल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे चेहर्‍याची ओळख बराच  वेळपर्यंत पटली नाही. करीता एसडीपीओ महामुनी यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार श्री फुंदे व सहकार्‍यांनी वेगाने तपास चक्र फिरविले असता खून झालेला  युवक अविनाश मिसाळ असल्याचे पोलीसांना कळाले. तपासामध्ये घटनास्थळावरून जवळच राहत असलेल्या अजय वैराळकरवर पोलीसांची संशयाची सुई येवून  थांबली. पोलिसांनी त्याला घरी शोधले पण तो मिळून आला नाही. दरम्यान रात्री 11 वाजेच्या सुमारास मेहेत्रे हॉस्पीटल परिसरात अजय वैराळकर मिळून आला.  पोलीसांनी त्याला पकडल्याबरोबर त्याने आपणच खुन केला असल्याची कबूली पोलीसांना दिली.
आरोपी अजय वैराळकर रा. कर्‍हाळे ले-आऊट, बुलडाणा हा सहकार विद्या मंदिरच्या स्कूल बसवर ड्रायव्हर आहे. घटनेच्या दिवशी नियमीत ड्युटी  करून घरी जात असतांना मृतक अविनाश मिसाळ आपल्याला भेटला. यावेळी त्याने आपण खूप दिवसांनी भेटलो आहे, मला दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणत  माझ्याजवळलील पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. प्रकरण हाणामारी पर्यंत येवून पोहचल्याने झालेल्या भांडणात अविनाशला कायमचे संपविल्याचे आरोपी अजय  वैराळकरने पोलीसांना सांगितले. पोलीसांनी आरोपी अजय वैराळकर याला ताब्यात घेवून त्याच्या विरुध्द कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास  एपीआय हरीष ठाकूर करीत आहेत. सदर कारवाईमध्ये एसडीपीओ महामुनी, पीआय फुंदे, एपीआय हरीष ठाकूर, एपीआय संग्रामसिंग पाटील, पीएसआय गोरे,  महिला पीएसआय मनिषा हिवराळे या अधिकार्‍यांसह पोलिस कर्मचारी लक्ष्मण जाधव, दिलीप पवार, राजू चौधरी, प्रभाकर लोखंडे, सरदार बेग, गजानन लहासे,  संजय ठोंबरे, कृष्णा निकम, मनोज नाफडे, डिगांबर कपाटे, विशाल वाडेकर, गणेश सुसर, प्रकाश बाजड, सुनिल दळवी इत्यादींनी सहभाग घेतला.