Breaking News

कर्नाटकातील सरपंच खूनाचा छडा

सांगली, दि. 30 - लवंगा-गिरगाव (ता. जत) रस्त्यावर कर्नाटकातील मडसनाळ (ता. विजापूर) येथील सरपंच सुधीर योगाप्पा सोड्डी (40) यांच्या खुनाचा पाच महिन्यांनंर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छडा लावला. याप्रकरणी अरविंद आण्णाप्पा पुजारी (28, रा. सनकहळ्ळी, ता. इंडी, विजापूर) व महादू काशिराम पुजारी (26 रा. कणुर, विजापूर) या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक राजकारण व शेत जमिनीसाठी हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील मडसनाळ हे गावे जत तालुक्याच्या सीमेवर आहे. तेथे सुधीर सोड्डी हे सरपंच होते. उमदी (ता. जत) येथील मल्लिकार्जुन मंदिरात प्रत्येक अमावस्याला सोड्डी दर्शनासाठी यायचे. 2 ऑगस्ट 2016 ला. श्री. सोड्डी त्यांचा मित्र रेवणसिद्ध पुजारी यांच्यासोबत दुचाकीवरुन दुपारी मंदिरात दर्शनासाठी येत होते. जत तालुक्यातील लवंगा-गिरगाव रस्त्यावर दबा धरुन बसलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. सोड्डी यांनी दुचाकीवरुन खाली पाडून दांडक्याने बेदम मारहाण करुन खून करण्यात आला. खून झाल्यानंतर हल्लेखोरांनी चारचाकीतून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला, मात्र धागेदोरे हाती लागले नाहीत.
त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास सोपवण्यात आला. पोलिस निरिक्षक बाजीराव पाटील यांच्या खबर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणा सुरु झाली. त्यानंतर अरविंद पुजारी आणि महादु पुजारी यांना अटक करण्यात आली. सखोल चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. महादु यांच्या मावशीची 40 एकर शेत जमीन आहे. त्यापैकी सुधीर सोड्डी यांनी सोळा एकर जमीन घेतली होती. याच कारणावरुन त्यांच्यात वाद होता. तसेच श्री. सोड्डी हे सरपंच असल्याने राजकीय संघर्षही सुरु झाला. त्यातून श्री. सोड्डी यांचा काटा काढला. अरविंद पुजारी यांचे वडील आण्णाप्पा पुजारी हे नंदरगी पंचायत समिती गटातून सदस्य आहेत. तसेच तो स्वतः सोसायटीत लिपीक म्हणून कार्यरत होता. दोघांनाही सनकनळी (विजापूर) येथून अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली बुलोरी (एमएच 14 डीटी 6937) ही चारचाकीही जप्त करण्यात आली.पोलिस निरिक्षक बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक नारायण एकशिंगे, संदीप गुरव, परमेश्‍वर नरळे, नारायण निकम, जितेंद्र जाधव, अरुण टोण, मारुती सूर्यवंशी, मेघराज रुपनर, अमित परीट, श्याम काबुगडे, सचिन सुर्यवंशी, साईनाथ ठाकूर, मारुती साळुंखे, सुरेश शिंदे, विजय पुजारी, विजय कोळी, रविंद्र पाटील, विकास भोसले, शशिकांत जाधव यांचा कारवाईत सहभाग होता.