Breaking News

छळ थांबवा, अन्यथा व्यापार-उद्योगांचे कर्नाटकात स्थलांतर

सांगली, दि. 30 - एलबीटी असेसमेंटच्या नावाखाली व्यापारी, उद्योजकांची महापालिका प्रशासनाकडून अडवणूक सुरु असून, कोणताही दोष नसताना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून होणारा हा छळ थांबविण्यात यावा अन्यथा महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापार, उद्योगांचे कर्नाटकात स्थलांतर करु, असा इशारा सर्व व्यापारी, उद्योजक संघटनांच्या नेत्यांनी पत्रकार बैठकीत दिला.
व्यापारी एकता असोसिएशन, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स, वसंतदादा औद्योगिक वसाहत, गोविंदराव मराठे वसाहत, मिरज, एमआयडीसी अशा सर्व व्यापारी, उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी 15 फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाने नोटिसा मागे न घेतल्यास 16 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला.
व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, ज्या व्यापार्‍यांनी थकबाकीसह कर भरला आहे, अशा व्यापार्‍यांच्या असेसमेंटसह कारवाईच्या सर्व नोटिसा रद्द केल्या पाहिजेत व सीए पॅनेल रद्द करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवेदन सोमवारी आयुक्तांना सादर केले जाणार आहे.
दीपक शिंदे-म्हैसाळकर म्हणाले की, महापालिका प्रशासनाकडून उद्योजकांचा छळ सुरु आहे. प्रामाणिकपणे कराचा भरणा केला असतानाही नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.
 उद्योजकांकडून एलबीटी थकीत नसताना 18 कोटींची थकबाकी सांगत अधिकारी वसाहतीत जप्तीसाठी येत आहेत. त्यामुळे उद्योजकांत भीतीचे वातावरण आहे. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशीही या प्रश्‍नांवर चर्चा झाली असून, त्यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे.
चेंबरचे अध्यक्ष शरद शहा म्हणाले की, सांगली शहरातील व्यापारी प्रामाणिकपणे काम करत असतानाही त्यांच्यावर अन्याय सुरु आहे. सांगलीत सुरु होणार्‍या या आंदोलनाचे लोण राज्यभर पोहोचणार आहे.
यावेळी माजी अध्यक्ष रमणिक दावडा, उपाध्यक्ष दीपक चौगुले, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, मिरज एमआयडीसीचे उपाध्यक्ष विनोद पाटील, गोविंदराव मराठे वसाहतीचे अध्यक्ष गोविंद महाबळ, अ‍ॅड. अमित शिंदे, सुरेश पटेल, सोनेश बाफना, धीरेन शहा, सुदर्शन माने, मुकेश चावला उपस्थित होते.