Breaking News

उमेदवारी अर्ज विक्रीद्वारे ‘राष्ट्रवादी’च्या फंड उभारणी सुरु

सातारा, दि. 17 (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागण्यांसाठी इच्छुकांची रिघ लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात उमेदवारी अर्ज विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अर्ज विक्रीचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून राष्ट्रवादी कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. 64 जिल्हा परिषद गट व 128 पंचायत समिती गणासाठी सुमारे 1460 अर्जाची विक्री झाल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यालयातून देण्यात आली. राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणार्‍या इच्छुकांची संख्या पाहता अर्ज विक्रीला आणखी एक दिवस मुदतवाढ देण्यात आली असून रविवार, दि. 15 जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत अर्ज उमेदवारांना घेता आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादीने उमेदवारी अर्जासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीला वेगवेगळी फी ठेवली असून त्यामाध्यमातून 1 कोटीहून अधिक रक्कम राष्ट्रवादीच्या खात्यात जमा झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गरीब व फाटके पण निष्ठावंत उमेदवार शोधा व त्यांना निवडून आणा, असे सांगितले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज विक्री दि. 10 जानेवारीपासून सुरू केली आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अर्ज विक्रीलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. अर्ज विक्रीचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून इच्छूक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत अर्जाची विक्री सुरु होती. शनिवारी सायंकाळपर्यंत 1460 अर्जाची विक्री झाली असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण उमेदवारासाठी 15 हजार, सर्वसाधारण महिलेला 10 हजार, नागरिकांचा मागास प्रवर्गाला 7 हजार, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला 5 हजार, अनुसूचित जाती जमातीसाठी 3 हजार, पंचायत समितीसाठी सर्वसाधारणसाठी 10 हजार, सर्वसाधारण महिलेला 7 हजार, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 5 हजार, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी 3 हजार, अनुसूचित जाती जमातीसाठी 2 हजार रुपये अशी उमेदवारी अर्जासाठी संभाव्य उमेदवारांना मोजावे लागले.
गेल्या आठवड्यात खा. शरद पवार यांनी अजिंक्यतारा कारखान्यावरील सभेत नोटाबंदीवर भाष्य केले होते. त्याचवेळी गरीब, फाटक्या पण निष्ठावंत उमेदवाराला शोधून संधी द्या, असेही त्यांनी सांगितले होते. उमेदवारी अर्जांची संख्या पाहिल्यास राष्ट्रवादीकडे जमा झालेला आकडा कोटीच्या घरात जातो. एक दिवसाचा कालावधी वाढवल्याने राष्ट्रवादीकडे जमा झालेल्या फंडात रविवारी आणखी भर पडली.