Breaking News

आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करा : मुद्गल

सातारा, दि. 17 (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी अधिकार्‍यांनी सोपविण्यात आलेली  कामे काटेकोरपणे करुन आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी पत्रकार परिषदेत दिल्या.
जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक येथील नियोजन भवनात घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार विवेक साळुंखे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता श्रीकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्र प्रबंधक राजीव रंजन प्रसाद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पैसे व मद्याची अवैध मार्गाने वाहतूक, मतदारांना प्रलोभन ठरतील अशा व अन्य संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके तैनात करावीत, अशा सूचना देऊन मुद्गल म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील महत्वाच्या नाक्यांवर चेक पोस्ट पथक तैनात ठेवावे. प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा. तक्रार निवारण कक्षात आचार संहिता भंगाच्या तक्रारी स्वीकाराव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवावे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. यामध्ये पारंपरिक कल्पक योजना, नवीन तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. रात्री 10 नंतर ढाबे, हॉटेल्स बंद राहतील याची दक्षता घ्यावी. विक्रीकर विभाग, आयकर विभागाच्या माध्यमातून उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवण्यात येणार आहे. उमेदवाराने 20 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार रोखीने करावे त्यावरील व्यवहार हे कॅशलेस पध्दतीने करावे. यासाठी प्रत्येक निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराला बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याच्या सूचना कराव्यात.
सातारा जिल्ह्यातील निवडणुकांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने पारदर्शी व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी काटेकोरपणे दक्ष रहावे. पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून संवेदनशिल मतदान केंद्र निवडून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. या निवडणुकांसाठी भरारी पथक, तपासणी पथके, तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संशयास्पद बँक खात्यांची माहिती सर्व बँकेच्या व्यवस्थापकांनी द्यावी, असे आदेश मुद्गल यांनी दिले.