Breaking News

जिजाऊच्या लेकींनो स्वाभिमानाने जगायला शिका ः डॉ.अशोक चोपडे

बुलडाणा, दि. 15 - राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेबांनी जी मार्गदर्शक मुल्ये निर्माण केलेली आहेत त्या तत्वाचा आपल्या आयुष्यामध्ये विद्यार्थीनींनी वापर  करावा व स्वाभिमानाने जगणे शिकावे असे आवाहन महाराष्ट्र सत्यशोधक समाज अध्यक्ष ख्यातनाम वक्ते डॉ.अशोक चोपडे यांनी केले. स्थानिक श्री व्यंकटेश  महाविद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती प्रीत्यर्थ आयोजित अतिथी व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते, कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गजानन जाधव हे उपस्थित होते. 
मनात असुरक्षितता न बाळगता, कुठलाही न्युनगंड न बाळगता विद्यार्थिनींनी स्वबळावर यश मिळवावे व या परिसरामध्ये जिजाऊंचा वारसा चालवावा  असा सल्ला डॉ.चोपडे यांनी दिला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गजानन जाधव यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद  यांच्या विचारावर प्रकाश टाकला. जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या या पंचक्रोशीमध्ये आधुनिक जिजाऊ जन्माला याव्या, घडाव्या असा आशावाद यावेळी  अध्यक्ष महोद्यांनी व्यक्त केला. स्वामी विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान असुन त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे आवाहन प्राचार्य डॉ.गजानन जाधव  यांनी केले.
प्रमुख अतिथी डॉ.चोपडे यांच्या हस्ते ग्रंथालय विभागाव्दारे आयोजित ग्रंथ प्रदर्शन चे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने विविध स्पर्धांमध्ये  सहभागी झालेल्या विद्यार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविद्यालयीन कार्यक्रम विभाग प्रमुख  प्रा.एम.बी.जाधव यांनी केले. अतिथी परिचय प्रा.ज्ञानेश्‍वर गोरे यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार प्रा.बी.यु.काळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी  प्राध्यापकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.