Breaking News

वहन आकार वीज दरवाढ नव्हे, सोशल मिडीया चुकीचा, माहावितरणचा दावा

लातूर (प्रतिनिधी), दि. 30 - चालू महिन्यापासून वीजबिलात वहन आकाराचा नव्याने समावेश करून प्रतियुनिट 1 रुपया 18 पैसे वीज दरवाढ केल्याचा संदेश सध्या सोशल मिडियावर फिरत असून तो चुकीचा व वीजग्राहकांची दिशाभूल करणारा असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. राज्य विद्युत नियामक आयोगाने प्रथमच वीजदरातील अस्थिर आकारांची विभागणी केल्याने वहन आकार  स्वतंत्रपणे दाखविण्यात आला आहे. 
वीजदर निश्‍चित करण्याचे अधिकार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला आहेत. त्यामुळे महावितरण वीजदर ठरवू शकत नाही किंवा बदल करु शकत नाही. 26 जून 2015 च्या वीज दर आदेशापर्यंत वीजबिलात स्थिर आकार व अस्थिर आकार अशा दोन भागांतच आकारणी होत असे. 03 नोव्हेंबर 2016 च्या आयोगाच्या आदेशानुसार आता वीजबिलांत स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार अशा तीन भागांत आकारणी केली जात आहे. यापैकी वीज आकार व वहन आकार हे पूर्वीच्याच अस्थिर आकाराचे दोन भाग आहेत. सदर बाबींचा विचार करता वहन आकारामुळे 35 ते 40 टक्के वीज दरवाढ झाली आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. विद्युत नियामक आयोगाच्या प्रसिध्दीपत्रकाप्रमाणे घरगुती ग्राहकांच्या वीजदरात केवळ सरासरी 1.3% टक्के इतकीच वाढ झालेली आहे. हे दर 01 नोव्हेंबर 2016 पासून लागू असून नव्या वीजदरात वहन आकार प्रथमच वेगळा दाखवला आहे.