Breaking News

उमेदवारांना प्रचारासाठी केवळ तीन मोठी वाहने वापरता येणार

पुणे, दि. 30 - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्‍या उमेदवारांना प्रचारासाठी जास्तीत जास्त दहा व कमीत कमी तीन मोठी वाहने वापरता येईल. दुचाकी किती वापरायच्या यावर कोणतेही बंधन राहणार नाही. केवळ त्यासाठीचा दैनंदिन खर्च निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागणार आहे. 
निवडणूक आचारसंहिता कालावधीत प्रचारफेरी किंवा मिरवणुकीत किती वाहनांचा वापर करता येईल, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार प्रचारफेरी किंवा मिरवणुकीत वापरण्यात येणार्‍या वाहनांची संख्या जास्तीत जास्त 10 राहील. त्यामध्ये जास्तीत जास्त तीन वाहने चारचाकी व तीनचाकी असतील. इतर वाहने दुचाकी असू शकतील. परंतु, यामध्ये मंत्री किंवा अन्य प्रचारकाला सुरक्षेसाठी पुरविण्यात येणार्‍या वाहनांचा समावेश असणार नाही. मात्र अशा वाहनद्वारे प्रचार करता येणार नाही.
प्रचारासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांची पूर्वपरवानगी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून घेणे बंधनकारक राहणार आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वाहनांचा प्रचारफेरी किंवा मिरवणुकीत वापर करणे व परवानगी नसणार्‍या वाहनाद्वारे प्रचार करणे या दोन्ही गोष्टी निवडणुकीतील गैरप्रकार मानण्यात येणार आहे. तसेच त्याचा खर्च प्रचारफेरीच्या खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित उमेदवार वा त्याच्याशी संबंधित राजकीय पक्षावर (पक्षाची प्रचारफेरी वा मिरवणूक असल्यास) कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. प्रचारासाठी वापरण्यात येणारी वाहने एकाच उमेदवाराच्या प्रचारासाठी असल्यास त्यासाठीचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. तसेच प्रचार आघाडीतर्फे करण्यात येत असल्यास मिरवणूक जेथून जाईल, त्या सर्व प्रभागातील संबंधित पक्ष किंवा आघाडीच्या उमेदवारांमध्ये खर्च समप्रमाणात विभागून दाखविण्यात येणार आहे.
बुलेटप्रूफ वाहनाला परवानगी
झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आलेल्या व्यक्तींना आचारसंहितेच्या कालावधीत बुलेटप्रूफ वाहनाचा वापर करता येईल. मात्र बुलेटप्रूफ वाहनाचा वापर अशासकीय कारणासाठी करण्यात आल्यास त्याचा खर्च संबंधित उमेदवाराला सादर करावा लागणार आहे.