Breaking News

ड्रग्जची इंजेक्शन, बोटं तुटली, पाक जेलमध्ये चंदूवर अत्याचार

नवी दिल्ली, दि. 31 - नजरचुकीनं सीमारेषा ओलांडून पाकच्या हद्दीत शिरलेल्या चंदू चव्हाणवर पाकिस्तान लष्करानं अनन्वित अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. चंदूला वारंवार बेदम मारहाण केली जायची. तसंच त्याला सातत्यानं ड्रग्जची इंजेक्शन दिली जात होती. अशी धक्कादायक माहिती चंदूचा भाऊ भूषण चव्हाणनं दिली आहे. कैदेत असताना चंदूला पुरेसं अन्नही दिलं जात नसल्याचं चंदूच्या भावानं सांगितलं आहे. तब्बल 4 महिन्यांनी भारताच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पाकिस्ताननं चंदूची सुटका केली होती.
सध्या चंदूवर अमृतसरच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उचपार सुरु आहेत. यावेळी कुटुंबीयांच्या भेटीत चंदूनं पाकच्या अत्याचाराची माहिती दिल्याचं भूषण चव्हाणानं म्हटलं आहे. भूषण म्हणाला की, ‘अटक केल्यापासून चंदूला अंधार्‍या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. चंदूनं अटक झाल्यानंतर 21 जानेवारीला पहिल्यांदा वाघा बॉर्डरवर उजेड पाहिला. त्याला वारंवार मारहाण केली जात होती. तसेच त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून पाकिस्तानी लष्कर त्याला एका कॅम्पमधून दुसर्‍या कॅम्पमध्ये नेत होते. चंदूची बोटं तुटला असून त्याच्या गुडघ्यालाही मार लागला आहे.’ ‘या सर्व प्रकारामुळे चंदू थोडासा खचला आहे. पण काहीच दिवसात तो ठीक होईल.’ अशी माहिती चंदूच्या आजोबांनी दिली.