Breaking News

युतीचा पोपट का मेला...!

दि. 31, जानेवारी - राजकारणात सदा सर्वकाळ कुणीही कुणाचा शञू वा मिञ असू शकत नाही.हे ब्रीद जुनेच असले तरी त्याचे संदर्भ आणि संदर्भित परिणाम माञ काळप्रवाहात बदलले आहेत.त्याचे कारण म्हणजे सत्ताकेंद्रीत राजकारण.राजकीय पक्ष सत्तेच्या आहारी गेल्याने सर्व संदर्भ,आदर्श ,तत्व पिकल्या पानासारखे गळून पडलेत,कालपर्यंत राजकारणात मिञ होते ते आज शञूत्वाच्या औकातीवर उतरलेत आणि जे एकमेकाच्या उंबर्याबाहेर सांडलेले पाणीही ओलांडणे म्हणजे भयंकर पाप समजत होते ते आज मिञत्वाच्या मुंडावळ्या बांधण्यासाठी बाहुल्याचा शोध  घेत आहेत.
पुर्वीही अशा गोष्टी घडत नव्हत्या असे नाही,माञ तेंव्हा निकोपता होती.स्पर्धेतही तत्व पाळले जात होते.तत्वाधिष्ठीत राजकारणाचा तो काळ इतिहास जमा झाला आहे.आज जे पहायला मिळते ती आहे सत्तेची साठमारी. राजकारणातील मैञीला तत्वांची नव्हे सत्तेच्या सारीपाटावर हुकुमत गाजविता येण्याइतपत वाटा हवा आहे.अगदी काल परवा राज्याच्या राजकारणाला परिणामकारक वळण देण्यास कारणीभूत ठरलेली घटना म्हणजे भाजपा शिवसेना युतीचे भग्न होणे.युतीच्या नशिबी अशी भग्नावस्था हुकुमत गाजविण्याच्या महत्वाकांक्षेचेच अपत्य आहे.गेल्या दोन दिवसात भाजपा सेनेच्या महानुभावांच्या मुखातून बाहेर पडत असलेली मुक्ताफळे तरी हेच दर्शवितात. या दोघांमध्ये डावे उजवे करायची वेळ आली किंवा युती भग्न होण्यास कुणाला जबाबदार  कोण याचे उत्तर घ्यायचे म्हटले तर कुणा एकाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करता येणार नाही.कमी अधिक प्रमाणात दोघानाही जबाबादार धरता येईल.तरी देखिल जबाबदारी निश्‍चित करायचा म्हटलं तर युतीच्या भग्नतेला भाजपावर करता येईल. याठिकाणी भाजपाला लक्ष्य करून शिवसेनेला फेवर देण्याचा हेतू मुळीच नाही. युती धर्मात वरचढ डोईजड  होण्याच्या लालसेत ज्यांचा हात धरून भाजपा महाराष्ट्रात रांगू लागला त्या शिवसेनेला प्रभावहीन करणारी नीतीच युती भग्नतेला कारणीभूत आहे.ही बाब स्पष्ट आहे. अडचणीच्या काळात भाजपाला मदतीचा हात देणारी सेना अडचणीत असतांना आणखी अडचणीत आणण्याच्या दिशेनेच भाजपाची पाऊले पडलेली दिसतील. अगदी ऊदाहरणचं द्यायची झाली तर बाळासाहेब ठाकरे यांनी आघाडीच्या राजकारणात अटल बिहारी वाजपेयी यांना दिलेली खंबीर साथ,घटक पक्षांचा अट्टाहास अटलजींना पुर्ण करता यावा सेनेच्या दोन मंञ्यांचे राजीनामे घेत जागा मोकळी करण्याची दाखविलेली तयारी, गुजरात दंगलीनंतर मुख्यमंञी पद धोक्यात आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या मागे बाळासाहेबांनी उभी केलेली ताकद ,शंकरसिंग वाघेला यांना शिवसेनेत येण्यास रोखून गुजरात भाजपाला दिलेले जीवदान असो नाहीतर गोपीनाथ मुंडे यांना भाजपामधून बाहेर पडण्यापासून परावृत्त करणारे शिवसेनाप्रमुख, वरूण गांधी  हिंदूत्वाच्या मुद्यावर अडचणीत आल्यावर स्वकीय भाजपेयींनी साथ सोडल्यानंतर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलेले बाळासाहेब,आणि त्याहीपेक्षा ज्यांच्यामुळे भाजपा राजकारणात प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वापर केवळ शिडी म्हणूनच झाला.हे अवघा महाराष्ट्र जाणतो.तेच बोलतो आहे.याचाच अर्थ भाजपाने निदान महाराष्ट्रात तरी शिवसेनेच्या बाबतीत भाजपाने गरज सरो वैद्य मरो हेच धोरण अवलंबले.युतीच्या धर्मात शिवसेनेने महत्वाकांक्षेपेक्षा मैञीलाच अधिक महत्व दिल्याचे दिसते याउलट भाजपचे धोरण दिसले आणि हेच युती भग्नतेचे मुळ आहे.