Breaking News

सेवानिवृत्तांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नशील : जोर्वेकर

पाटण, दि. 17 (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी संघटनेचे बळ वाढवावे, असे आवाहन सातारा जिल्हा सेवानिवृत्त संघटनेचे कार्याध्यक्ष दादासाहेब जोर्वेकर यांनी केले.
पाटण येथे सोसायटीच्या सभागृहात आयोजित पाटण तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची वार्षिक सहविचार सभा व एकात्मता दिन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष तुकाराम माने होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस बाबुराव धनावडे, कार्यकारी उपाध्यक्ष बा. मा. शिंदे, सहउपाध्यक्ष सु. आ. खरात, उपाध्यक्ष मधुकर थरवल उपस्थित होते.
जोर्वेकर म्हणाले, 1986 पूर्वी आलेल्या वेतन आयोगाने सेवानिवृत्तांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवले होते. 17 डिसेंबर 1982 च्या न्यायालयाच्या निकालामुळे 1986 च्या चौथ्या वेतन आयोगामध्ये सेवानिवृत्तांची दखल घेतली. पाचव्या वेतन आयोगाने सेवानिवृत्तांसाठी भरीव शिफारशी केल्याने सेवानिवृत्तांना खर्‍या अर्थाने न्याय मिळाला. संघटनेचे बळ मोठे आहे. केंद्रिय सेवेतील कर्मचार्‍याप्रमाणे वैद्यकीय भत्ता मिळवण्यासह अन्य न्याय मागण्यांसाठी संघटीतपणे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबुराव धनावडे यांनी सेवानिवृत्तांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना बांधील असल्यामुळे संघटनेच्या पाठीशी ठाम रहावे.
यावेळी बा. मा. शिंदे यांनी निवड श्रेणीबाबत मार्गदर्शन केले. सु. आ. खरात व शिवाजी साळुंखे यांनी मनोगते व्यक्त केली. दरम्यान, जिल्हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ह. तु. पाटील, सत्यवान शिखरे, तालुका पुरस्कार मिळाल्याबद्दल लक्ष्मण इंगळे, बा. खं. शिंदे, यशवंत शिबे, रविकांत रेडीज यांचा तसेच 80 पेक्षा अधिक वय असणार्‍या सभासदांचा सत्कार करण्यात आला. तुकाराम माने यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. सत्यवान शिखरे यांनी सूत्रसंचालन केले. यादवराव शिर्के यांनी आभार मानले. यावेळी शामराव घाडगे, बंडू कदम, मारूती पवार, किसन पडवळ, वामनराव लोहार, रामचंद्र घाडगे, ल. सा. पाटील, भा. ब. गव्हाणे, अं. ल. गायकवाड, दा. सु. मुल्ला, द. व. गुरव, न. रा. देसाई, शा. ना. पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.