Breaking News

काँग्रेस-राष्ट्रवादी युतीसाठी प्रयत्न

सांगली, दि. 17 - आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देतांना कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आम. जयंत पाटील यांनी दिली. 
आज पटवर्धन हॉल येथे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीने घेतल्या. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुकांचे समर्थक मोठ्या संख्येंने उपस्थित होते. मुलाखतीपूर्वी मार्गदर्शन करतांना आम. जयंत पाटील यांनी सर्व इच्छुकांना दिलासा दिला. इच्छुकांनी कोणताही गैरसमज करुन घेऊ नये. हा माझ्याजवळचा, तो दूरचा, हा शिफारस आणणारा, तो नात्यातला असे काही समजू नये. उमेदवारी दिल्यावर असे गैरसमज निर्माण होतात. पक्षाच्या सर्व्हेमध्ये तसेच कार्यकर्त्यांमधून ज्याचे नांव पुढे येईल त्याला उमेदवारी देण्यात येणार आहे. अशामध्ये एखादा सामान्य, गरिब कार्यकर्ता जरी पुढे आला तरी पक्ष त्याच्या पाठीशी भक्कमपणे राहिल असे आम. पाटील म्हणाले.
इच्छुकांच्या नांवाची निवड करण्यासाठी सहा जणांची समिती नेमण्यात आली आहे. त्यात स्वतः आम. पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब हुळ्ळे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष कमलाकर पाटील, बाळासाहेब होनमोरे,  यांचा समावेश आहे. सायंकाळी मुलाखती संपल्या. मुलाखती दिलेल्या इच्छुकांची यादी पाटील, शिंदे यांच्याकडे आहे.