Breaking News

घोरपडे यांचा विकास आघाडीचा नारा

सांगली, दि. 17 - कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चार गट, पंचायत समित्यांच्या आठ गणांसाठी निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय फिल्डींग लावली आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी स्वाभिमानी विकास आघाडीचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीनेही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून स्वबळाची तयारी दाखविली. भाजपने अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केली नसली तरी मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेनेही यापूर्वीच कोणाशीही आघाडी न करता स्वबळावर निवडणुका लढविणार असे स्पष्ट केले. कवठेमहांकाळ तालुक्यातील यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षवेधी तर ठरतीलच पण किसमें कितना है दम, या भूमिकेत सर्वांनीच तयारी सुरु केली आहे.
नव्या पुनर्रचनेमुळे कवठेमहांकाळ शहरात नगरपंचायत निर्माण झाल्यामुळे शहर वगळता चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीचे मतदारसंघ निर्माण झाले. नव्या रचनेमुळे मतदारसंघात इच्छुकांच्या संख्येंत भर पडली आहे. नुकताच माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा शेतकरी मेळावा झाला. मेळाव्यात घोरपडे यांनी जुन्या नव्यांचा मेळ घालत आता 1992 सालच्या स्वाभिमानी विकास आघाडीचा एल्गार पुकारत पैशात कमी असलो तर दांडक्यात कमी नाही असे सांगत शक्तिप्रदर्शन केले. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील यांनी युवकांना व प्रामाणिकांनाच संधी देण्याचे सुतोवाच केले आहे. आमदार जयंत पाटील, आमदार सुमन पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या.
खासदार संजय पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रमुख मंत्र्यांना एकत्र आणून म्हैसाळ तसेच टेंभू योजनांच्या शिल्लक कामांचा प्रारंभ केला. यानिमित्ताने ढालगावात झालेल्या मेळाव्यामुळे जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. नूतन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी साथ देण्याचे आवाहन केले. शिवसेना तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांनीही स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसनेही तयारी सुरु आहे. काही मतदारसंघ पूर्णपणे सुरक्षित असल्याने इच्छुकांची संख्या वाढते आहे. यामुळे नत्यांपुढे कोणाला संधी द्यायची ? असा प्रश्‍न उभा आहे.