Breaking News

औंधला आई उदे गं अंबे उदेच्या जयघोषात यात्रेस सुरुवात

औंध, दि. 15 (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाई देवीचा वार्षिक रथोत्सव यात्रेस आई उदे गं अंबे उदेच्या जयघोषात  हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या औंध, ता. खटाव येथील श्री यमाई देवीच्या रथोत्सवास दुपारी एक वाजता प्रारंभ झाला. त्यापूर्वी माजी  उपमुख्यमंत्री अजित पवार व श्री यमाई देवस्थानच्या चीफ ट्रस्टी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करण्यात आले.
यावेळी गणेश इंगळे, नंदकुमार जोशी, हेमंत हिंगे, अनिकेत इंगळे, केदार हिंगे यांनी पौरोहित्य व मंत्रपठण केले. यावेळी दूध, दही, पुष्प अर्पण करून देवीची पूजा  करण्यात आली. त्यानंतर देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापना करण्यात आली. तेथे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करण्यात  आली. पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृंदाच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली.
यावेळी चारुशीलाराजे, हर्षिताराजे, सुंंदरगिरी महाराज, मनीषा सिंहासने, वैशाली फडतरे, बाळासाहेब सोळस्कर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, सुनंदा राऊत,  जितेंद्र पवार, सुरेंद्र गुदगे, मानसिंग माळवे, धैर्यशील कदम, सतीश फडतरे, सी. एम. पाटील, ज्ञानेश्‍वर जाधव, सुनील घोरपडे, सोनाली खैरमोडे, धनाजी पावशे,  प्रभावती चव्हाण, हणमंत शिंदे, संदीप मांडवे, रोशन खंबाटा, बखतावर पोछखानावाला, शिवाजी सर्वगोड, पोपट झेंडे, नवल थोरात उपस्थित होते.
त्यानंतर श्री यमाई देवीच्या रथोत्सवास उत्साही वातावरणात सुरुवात झाली. यावेळी रथाचे मानकरी माळी, भाविक, ग्रामस्थ यांनी रथ ओढून मिरवणुकीस प्रारंभ  केला. यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी श्री यमाई देवीचे दर्शन घेऊन रथावर एक रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या नोटांच्या माळा,  नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, गुलाल खोबरे अर्पण केले.
आई उदे गं अंबे उदेचा जयघोष केला. रथोत्सव मिरवणूक चावडी चौक, मारूती मंदिर, बालविकास मार्गे ऐतिहासिक पद्माळे तळ्यावर नेण्यात आली. सायंकाळी  उशिरा पद्माळे तळ्यामध्ये देवीस अभिषेक करून पूजन करण्यात आली.