Breaking News

मलकापुरात 100 किलो प्लास्टिक जप्त

नगरपंचायतीची मोहीम; नगरसेवकांची रॅली; प्लास्टिक आढळल्यास  5 हजार रुपयाचा दंड

कराड, दि. 15 (प्रतिनिधी) : मलकापूर नगरपंचायतीने शहरात प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती मोहिमेचा शुक्रवारी प्रारंभ केला. प्रत्येक विभागात नगराध्यक्ष,  उपनगराध्यक्षांसह नगरसेवक, अधिकार्‍यांनी फेरी काढून सुमारे 100 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. प्लास्टिक न वापरण्याच्या कडक सूचना  व्यावसायिकांना देण्यात आल्या असून यापुढे प्लास्टिकचा वापर आढळून आल्यास 5 हजारांपर्यंतचा दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला.
मलकापूर नगरपंचायतीने शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम हाती घेतली आहे. नुकत्याच नगरपंचायतीच्या सभेत याबाबत ठराव केला होता. शिवाय व्यापार्‍यांना  प्लास्टिकच्या पिशव्यांचा न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
नगराध्यक्ष सौ. कल्पना रैनाक, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, मुख्याधिकारी राजेंद्र तेली, नुरजहाँ मुल्ला, शंकरराव चांदे, मोहनराव  शिंगाडे, नगरसेवक प्रकाश बागल, ज्ञानदेव साळुंखे, बांधकाम अभियंता बनसोडे, ए. पी. मोहिते, श्रीकांत शिंदे, रामभाऊ शिंदे यांच्यासह कर्मचार्‍यांनी जनजागृती  फेरी काढली.
सकाळपासून शहराच्या प्रत्येक विभागात जनजागृती करत व्यावसायिकांना प्लास्टिक पिशव्या न वापरण्याच्या सूचना देत तिळगुळ दिले जात होते. त्याबरोबरच  कर्मचार्‍यांकडून प्रत्येक दुकानात प्लास्टिकच्या पिशव्या आहेत का? याची तपासणी केली जात होती. जिथे प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, तेथील पिशव्या जप्त  केल्या जात होत्या. दिवसभरात 37 वेगवेगळ्या दुकानांसह व्यावसायिकांकडून 100 किलो पिशव्या जप्त करण्यात आल्याचे बांधकाम अभियंता ए. पी. मोहिते यांनी  सांगितले.