Breaking News

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात तिळगुळाचे वाटप करीत मकर संक्रातीचा सण उत्साहात

पुणे, दि. 15 - ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत आयुष्यातील गोडवा वृद्धिंगत राहावा असे म्हणत एकमेकांना तिळगुळाचे वाटप करीत मकर संक्रांतीचा  सण पुणे, पिंपरी-चिंचवडकरांनी उत्साहात साजरा केला.
शहरात शनिवारी सकाळपासूनच प्रत्येकाच्या घरी पै-पाहुण्यांची लगबग पाहावयास मिळाली. बालचमूंनी प्लास्टिकचे रंगीबेरंगी व कार्टुन्सच्या आकारातील डबे हाती  घेऊन थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेत व मित्रांना तिळगूळ देत आनंद लुटला. नागरिकांनी, युवक-युवतींनी एकमेकांना एसएमएसद्वारे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा  दिल्या. शिवाय सोशल मीडियाद्वारेही संदेशांची देवाण-घेवाण झाली.
मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींनी हळदीकुंकू कार्यक्रमास प्रारंभ केला. शनिवारी सुटी असल्याने अनेक महिलांनी मंदिरात हळदीकुंकू कार्यक्रम घेतले. महिलांनी या  दिवशी हिंदू पद्धतीप्रमाणे शास्त्रीय कारणानुसार विशेष पोषाख परिधान केला होता. शहरातील महिलांनी शहरातील मोरया गोसावी समाधी मंदिर, शितळादेवी मंदिर  खंडोबा मंदिर, तुळजाभवानी मंदिर, गणेश मंदिर, दुर्गा माता मंदिरात पूजेसाठी गर्दी केली होती. पाच सुगडीत गव्हाचे ओंबे, ज्वारींची कणस, तिळगूळ, गाजर, ऊस,  हरभरा टाकून सुगडीत दिले. महिलांनी मंदिरात सुगडी-सुपाचे पूजन केले. मंदिरात मूर्तीसमोर मोठ्या आनंदात एकमेकींना हळदी-कुंकू लावले. सुगडी वाण  एकमेकींना देऊन संक्रातीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यातच काही महिलांनी मंदिरात उखाणे घेऊन पारंपरिकता जपली.