Breaking News

इंधन घोटाळ्याप्रकरणी पिंपरी महापालिका क्रीडा विभागातील लिपिक डाबेराव निलंबित

पुणे, दि. 15 - पिंपरी- चिंचवड महापालिकेतील क्रीडा विभागाचे लिपिक विशाल रमेश डाबेराव यांनी वाहन इंधन बिलांमध्ये फेरफार करून तब्बल 3 लाख 28  हजार 800 रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी लिपिक विशाल डाबेराव यांचे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निलबंन  केले असून त्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.
विशाल डाबेराव हे महापालिकेच्या क्रीडा विभागात लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे टपाल आवक-जावक, वाहन इंधन बिलांची प्रतिपूर्ती व समायोजन  असे कामकाज देण्यात आले आहे. डाबेराव यांनी सादर केलेल्या सर्व बिलांची उपलेखापाल राजश्री देशपांडे  यांनी तपासणी केली. यामध्ये त्यांनी 2014 -2015  ते 2016-2017 मध्ये वाहन इंधन प्रतिपूर्तीमध्ये आर्थिक स्वरूपाची अनियमितता, रकमेचा अपहार झाल्याचे देशपांडे यांच्या निदर्शनास आले. ही बाब त्यांनी  क्रीडा विभाग सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.
दरम्यान,  वाहन क्रमांक एमएच.14, सी.एल. 8062 व एमएच. 14, सी.एल 0324 या वाहन चालकाकडील लॉगबुकमध्ये बिलांच्या नोंदी व डाबेराव यांनी  प्रतिपूर्तीसाठा सादर केलेल्या बिलांमध्ये तफावत आढळून आली. वाहनांची प्रत्यक्षात झालेली धाव व वाहनात भरलेले इंधन यामध्ये मोठी अनियमितता असल्याचे  दिसून आले. डाबेराव यांनी 3 लाख 28 हजार 800 रुपयांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. याबाबत डाबेराव यांना क्रीडा विभागाने खुलासाही  मागविला. परंतु, त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याचा शेरा क्रीडा विभागाने मारला. यानंतर हा अहवाल सहाय्यक आयुक्तांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांना  सादर केला. तथापि, आयुक्तांनी इंधन बिलांच्या अपहारप्रकरणी डाबेराव यांचे निलंबन करून खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.