Breaking News

जिल्हा परिषद जिंका, लाल दिवा देतो ः मुख्यमंत्री फडणवीस

सांगली, दि. 03 - तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे, पण आगामी झेडपी, पंचायतीची सत्ता द्या, तालुक्याला लाल दिवा देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी शिराळकरांना दिली. 
येथे नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन, उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. त्यावेळी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री  चंद्रकांतदादा पाटील, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालक व सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार राजू शेट्टी, वनश्री नानासाहेब महाडिक, सांगली  जिल्हा भाजप अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूरचे नगराध्यक्ष शशिकांत पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील, माजी आमदार भगवानराव  साळुंखे, महिला प्रदेश उपाध्यक्षा नीताताई केळकर, युवानेते गोपीचंद पडळकर, भाजपचे माजी अध्यक्ष राजाराम गरुड यांची प्रमुख उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, राजकीय सौदा करुन वाकुर्डे योजनेला गती मिळण्यासाठी 200 कोटींचा निधी दोन ते तीन टप्प्यात दिला जाईल. चांदोली पर्यटनासाठी 15  दिवसांत मुंबईत एम.टी.डी.सी. सोबत बैठक घेऊन शिराळच्या नागपंचमीबाबत केंद्रशासनाची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यात येईल. राज्यातील 29 हजार  ग्रामपंचायती 2018 अखेर डिजिटल करणार असून शहर व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व शाळा डिजिटल करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे आरोग्य  व शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी व गोरगरिबांना वेळेत सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. राज्यातील जलसिंचन उपसा योजना व शेतीपंपाचे सर्व फिडर  सौरउर्जेवर सुरु केले आहेत. त्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. सौरउर्जेसाठी केंद्र शासनाकडून 3 कोटी प्रती मेगावॅट मदत मिळणार आहे. लोकांना चांगली सेवा  मिळावी म्हणून माहिती अधिकारीप्रमाणे सेवा हमी योजना कायदा आणला असून त्याचा लोकांनी लाभ घ्यावा. महिला बचत गटामार्फत उत्पादित केलेल्या मालाला  चांगली बाजार पेठ मिळावी यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर मॉल सुरु करण्यात येणार असून त्यात फक्त महिला बचत गटांनीच तयार केलेली उत्पादने असतील.
सहकार व पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सहकारक्षेत्र वाढला पाहिजे. शेतकरी सोसायटीचा केंद्र बिंदू असल्याने राज्यातील विकास सोसायट्यांचा प्रत्येक  शेतकरी सभासद करुन घेणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, वाकुर्डे योजनेला निधी द्या. जिवंत नागपूजेसाठी नागपंचसमीवेळी काही काळापुरती शिथिलता मिळावी. चांदोली पर्यटनाला  गती द्यावी. कोल्हापूर येते उच्च न्यायालय खंडपीठ व्हावे. मायक्रोफायनान्समध्ये अडकलेल्या महिलांना योग्य तो न्याय द्यावा. स्वागत सुखदेव पाटील यांनी केले.  जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी आभार मानले.

x