Breaking News

राजकारणातील गद्दारांना धडा शिकवा ः घोरपडे

सांगली, दि. 15 - राजकारणाचा बाजार मांडणार्‍या गद्दारांना कायमचा धडा शिकवा, इथून पुढच्या काळात जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज राहा, अशी टीका  माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी केली. कवठेमहांकाळ येथे अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मेळावा पार पडला, यावेळी ते बोलत होते.
घोरपडे पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात विकृत प्रवृत्ती फोफावत आहे. बाजार समितीच्या सभापती निवडीत माझ्यावर राजकारण करण्यात आले. परंतु  यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. राजकारणात बाजारु कार्यकर्ते वाढत आहेत, यांना थांबविणे गरजेचे असून त्यासाठी संघटना महत्वाची आहे. या  संघटनेच्या जोरावर अशा कार्यकर्त्यांना जनताच जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तसेच गोवा-गावातील राजकीय स्पर्धेमुळे आपल्याच संघटनेत फुट पडते. त्यामुळे आपापल्यातील स्पर्धा बाजूला ठेवून संघटना मजबुतीसाठी कामाला लागावे, असे  आवाहनही त्यांनी केले. समोर आलेल्या जि. प. व पं. स. च्या निवडणुकीत मोठ्या शक्तीने कार्यकर्त्यांनी उतरावे आणि कामाला लागावे, विजय, आपलाच असून  तो निश्‍चित आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी महादेव माळी, भारत डुबुले, अनिल पाटील, शहाजी निकम यांचीही भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक पांडुरंग पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी  तानाजीराव पाटील, तात्यासाहेब नलवडे, सुनील माळी, दिलीप झुरे, तानाजी यमगर, तानाजी शिंदे, राजाराम पाटील, विश्‍वनाथ कोळेकर, तुकाराम पाटील,  किसन टोणे, वैभव नरुटे, ख्वाजा खाटिक यांच्यासह मोठ्या संख्येंने कार्यकर्ते उपस्थित होते.