Breaking News

सिध्देवाडीला चित्रपट निर्मिती केंद्र

सांगली, दि. 15 - चित्रपट निर्मितीसाठी सर्व काही सेवासुविधा देणारे गाव म्हणून तासगांव तालुक्यातील सिद्धेवाडी गावाचा विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात  येणार असून त्यासाठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सर्व घटकांचे सहकार्य घेतले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिली. 
चौथ्या सांगली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्योजक शहाजीराव जगदाळे अध्यक्षस्थानी होते. सांगली संस्थानच्या राणीसाहेब  राजलक्ष्मी पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील गणेशनगरातील रोटरी सभागृृहात रविवारपर्यंत महोत्सव सुरु राहणार आहे. दिवसभरात 22 लघुपट स्पर्धेत  दाखविण्यात आले.
गायकवाड म्हणाले, गेल्या वर्षभरात सांगली जिल्ह्यात 22 चित्रपटांचे चित्रीकरण झाले. आम्ही जिल्ह्यात अशी दोनशे चित्रीकरण स्थळे निश्‍चित केली आहेत. त्याचा  एक डिजिटल कॅटलॉग तयार करी आहोत. या चित्रीकरण स्थळांकडे जाण्यासाठीचे फलकही आम्ही लावणार आहोत. कट्यार काळजात घुसली चित्रपटाचे निर्माता  सुनील फडतरे यांच्याशी चर्चा करताना असे लक्षात आले की, मुंबईत एखादी फिल्म बनवताना येणार्‍या खर्चाच्या एक चतुर्थाश खर्चात सांगलीत चित्रपट तयार  होतो. हेच आपले बलस्थान आहे. त्यामुळे आम्ही असं एक गाव तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत की त्या गावात चित्रपटासाठी लागणार्‍या सर्व साधन सेवा  सुविधा असतील. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे तिथले ग्रामस्थ वेशभूषेसह अन्य सर्व कामांत तज्ज्ञ कुशल असतील. त्यांच्यासाठी आम्ही प्रशिक्षणाच्या सुविधाही  निर्माण करु.
सांगली फिल्म सोसायटीचे अध्यक्ष अशोक सावंत म्हणाले, चित्रपट लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. सोसायटीने गेल्या काही वर्षांत चित्रपट पाहण्याची संस्कृती  रुजवण्याचा प्रयत्न केला. त्याला चांगले यशही येतेय. अनेक उद्योन्मुख कलावंत आता राज्यपातळीवर चमकत आहेत.
पर्यावरणविषयक जागृतीसाठी सोसायटीने केलेले प्रयत्नही यशस्वी झाले आहेत. हा महोत्सव अधिक भव्य दिव्य व्हावा यासाठी यापुढे प्रयत्नांची गरज आहे.
रोटरीचे अध्यक्ष के. के. शहा म्हणाले, रोटरी सामाजिक कामांबरोबरच कलासंस्कृतीच्या विकासासाठीही भरीव काम करण्यास सज्ज आहे.
उद्योजक शहाजी जगदाळे म्हणाले, सांगलीचे लोक चोखंदळ आहेत. राज्य आणि देशस्तरावर त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. चित्रपत्रट उद्योगातही सांगली  लवकरच आपला ठसा उमटवेल.
महेश कराडकर यांनी स्वागत केले. विशाल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर सौ. वंदना गायकवाड, अरुण दांडेकर आदी उपस्थित होते.