मराठा महासंघाच्या वतीने शेतकरी बचाव अभियानाचे आयोजन
अहमदनगर, दि. 03 - अखिल भारतीय शेतकरी मराठा महासंघाच्या वतीने शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने 25 फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत ’शेतकरी बचाव अभियान’ शिवनेरी किल्ला ते लाल किल्ला दरम्यान राबवले जाणार आहे. या अभियानासाठी उपस्थित राहण्याचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना दिले. शेतकर्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागु करावा, शेतकर्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतकर्यांना वीज मोफत मिळावी, शेतकर्यांच्या मुला, मुलींना संपूर्ण मोफत शिक्षण मिळावे, राज्यभर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शेतकर्यांच्या मुला, मुलींसाठी वसतिगृह उभारावे या मागणीवर राज्य सरकार केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी ’शेतकरी बचाव अभियान’ सुरू करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यापासून ते दिल्ली येथील लाल किल्ल्यापर्यंत हे अभियान राबवले जाईल. अभियानादरम्यान मार्गदर्शनासाठी उपस्थित राहावे, असे पत्र दहातोंडे यांनी माजी केंद्रीय मंत्री पवार यांना नुकतेच दिले.