Breaking News

अशोक डोळसे यांनी एकाच खडूवर साकारली सिंगापूर-मलेशियाची वैशिष्ट्ये

अहमदनगर, दि. 16 - कलाकाराची कलाकृती ही त्यांच्या पुर्वानुभव आणि सुक्ष्म निरिक्षणातून घडत असते. आपले कलात्मक कसब आणि नाविन्याचा ध्यास  यातून कल्पक, सुंदर चित्र-शिल्पकृतींची निर्मिती तो करतो. अशाच आपल्या कलानुभवातून खडूसारख्या छोट्या ठिसूळ माध्यमावर नगरच्या अशोक डोळसे यांनी  सिंगापूर आणि मलेशियाची वैशिष्ट्ये कोरली आहे. भव्य, आकर्षक इमारती, जगातील अनोखा सर्वात मोठा स्वीमिंग पूल असलेले हॉटेल आणि सिंगापूरचे मानचिन्ह  असलेले अनोखे शिल्प, फलाय ओअर आदि यथार्त पद्धतीने एकाच खडूवर कोरले आहे. खडूच्या वरच्या भागात दिड सेंटीमीटर पेक्षाही कमी उंचीच्या या शिल्पाचा  चेहरा सिंहाचा तर शरीर माशाचे आहे. मूळ शिल्पकृतीच्या बारकाव्यासह अत्यंत रेखी व प्रमाणबद्ध असे हे मिनिएचर शिल्प दिसते. पाण्यांच्या लाटावर आपल्या  शेपटीच्या गोलाकार भागावर ऐटदारपणे उभे असलेले हे शिल्प होय. चेहर्‍यावर शौर्याचे भाव, मानेवर कलात्मक आणि विस्तारलेल्या स्वरुपात आयाळ दर्शविली  आहे. उर्वरित शरीर लयदार आकारात असून, संपूर्ण शरीरावर अर्धगोलाकृती आकाराचे प्रमाणबद्ध घौले कोरलेले दिसतात. सिंहाची नजर उंच असून, जबडा उघडा  असून देखील तो हिंस्त्र वाटत नाही. मूळ मुर्तीच्या जबड्यातून पाण्याची मोठी धार अखंड समुद्रात पडत असते, असे निरिक्षण आपल्या प्रवासात नोंदविले आहे.
खडूच्या खालील भागात उत्थीत पद्धतीने मलेशियाची वैशिष्ट्य पूर्ण जुळी इमारत (ट्वीन टॉवर)समोरच्या भागात कोरली असून आजुबाजुला दिसणार्‍या इमारती  देखील दाविल्या आहेत. त्याच्या बाजुलाच जगातील सर्वात मोठा स्वीमिंग पुल 58 व्या मजल्यावर असलेले हॉटेल मरीन बेसँड दाखविले आहे. संपूर्ण सिंगापूरचे  हवाई दर्शन घडविणारा स्काय फ्लाय ओअरचा काही भाग दर्शविला आहे. त्याच्या खालील भागात समुद्राच्या लाटा दाखवल्या तर भव्य अवकाशात चमकणारे तारे  दर्शविले आहे. हे सर्व छोट्या 100 एम.एम. व्यासाच्या वर्तुळाकृती आणि तीन इंच उंचीच्या खडूवर कोरले आहे. हे शिल्प सर्व कलारसिक नगरकरांसाठी सावेडी  उपनगरातील अशोका आर्ट गॅलरीत मोफत पहाण्यासाठी उपलब्ध आहे.