Breaking News

माळवाडीच्या संशयितास 9 दिवसांची कोठडी

सांगली, दि. 17 - येथील चौदा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करुन तिचा तोंड दाबून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत उर्फ हिमेश राजेंद्र सोंगटे याला जिल्हा व सत्र न्यायाधिश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उल्हास चिप्रे यांनी युक्तीवाद केला. शुक्रवार 6 जानेवारी भिलवडी पासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या माळवाडी येथील चिपटे मळ्याजवळ शाळकरी मुलीचा मृतदेह आढळून आला होता. तिच्यावर अत्याचार करुन खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ माजली होती. जिल्हा तसेच राज्य पातळीवर या प्रकरणाची दखल घेण्यात आली होती. पोलिसांनी घटनेची तीव्रता लक्षात घेत तब्बल 150 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या माध्यमातून तपास सुुरु केला होता.
शंभर ते सव्वाशे जणांची कसून चौकशी केल्यानंतर प्रशांत उर्फ हिमेश सोंगटे याचे नाव निष्पन्न झाले होते. शनिवारी सकाळी त्याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने पिडीत मुलीचा बलात्कार करुन खून केल्याचे कबून केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात सद्य स्थितीत 9 भक्कम पुरावे गोळा करण्यात आले आहेत. दरम्यान रविवारी त्याला जिल्हा व सत्र न्यायाधिश सौ. एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. घटनेबाबत अजून काही माहीती संशयित नराधम प्रशांत याच्याकडून मिळवायची असल्याने न्यायालयाने त्याला 9 दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.