Breaking News

सांगलीत दूषित पाण्यामुळे पोटाच्या तक्रारीचे रुग्ण वाढले

सांगली, दि. 16 - शहराला सध्या पुरविण्यात येणार्‍या पिण्याच्या दूषित पाण्यामुळे पोटाच्या तक्रारींचे रुग्ण अनेक खासगी दवाखान्यातून उपचार घेत आहेत.  नदीतील पाणी हिरव्या रंगाचे झाले आहे. त्याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. दरम्यान बरेच दिवस गारठा टिकून राहिल्याने नागरिकांना  ताप, सर्दी खोकल्यांचा त्रास होत आहे.
कृष्णा नदीचे पाणी सध्या दूषित बनले आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. लोकांना पोटाचे विकार, अपचन, हगवणीचा त्रास चालू आहे,  असे मत एका खासगी डॉक्टरांनी बोलताना स्पष्ट केले. सध्या नदीतील पाणी हिरवट रंगाचे असून घरातील साठवणुकीच्या मोठ्या भांड्यात त्याची घाण दिसून येत  आहे. शहरात सकाळी आणि रात्री शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. पहाटे घराबाहेर पडणारे लोक उबदार कपडे परिधान करुनच बाहेर पडत आहेत. शहरात  गेल्या चार दिवसांपासून थंडीची लाट कायम आहे. सकाळी दहापर्यंत थंडी कायम राहत आहे. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच थंडी प्रदीर्घ काळ टिकून राहिली आहे.  गेल्या पंधरवड्यात दिवसातील नीचांकी म्हणजेच 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आठ दिवसांत सरासरी 13 ते 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद  झाली आहे. थंडीचे प्रमाण वाढल्याने सकाळी मॉर्निंग वॉकर्सच्या संख्येत घट झाली आहे. थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णसंख्येंतही वाढ झाली आहे. ताप, सर्दी,  खोकला आदी आजारांनी डोके वर काढले आहे. आबालवृद्धांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.