Breaking News

सरकारी कर्मचार्‍यांचे 18 ला कामबंद

सांगली, दि. 16 - राज्य सरकारी, निम सरकारी व शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार (18 पासून) तीन दिवस काम बंद  आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष जे. के. महाडीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाडिक म्हणाले, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून लागू करा, ही प्रमुख मागणी संघटनेची आहे. अन्य राज्यात त्याची  अंमलबजावणी झाली आहे. परंतु महाराष्ट्रात अद्यापही केलेली नाही. याचबरोबर अन्य मागण्याही आहेत. त्यासाठी गेल्या दोन वर्षात लक्षवेध दिन, निषेध दिन, दोन  तास, जादा काम आंदोलन, मोर्चा करुन सातत्याने पाठपुरावा करुनही शासनाने प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. आता राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे.  राज्यातील 19 लाख सराकीर, निम सरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील 35 हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. बुधवारी (18) सकाळी 11 वाजता पुष्पराज चौकात एकत्रीकरण केले जाणार आहे. तेथून जिल्हाधिकारी  कार्यालयावर मोर्चा नेला जाणार आहे. जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदनही दिले जाईल. कर्मचार्‍यांनी उपस्थित रहावे. यावेळी कार्याध्यक्ष डी.जी. मुलाणी,  उपाध्यक्ष शरद पाटील, एस. एच. सुर्यवंशी, पी. एन. काळे, संजय व्हनमाने, संदीप सकट, गणेश दुमाळ, राजू कलगुटगी, सुभाष थोरात, जाकीर मुलाणी, अस्लम  मुजावर उपस्थित होते.