Breaking News

अर्थमंत्रालयाने रिझर्व्ह बँकेच्या कारभारातील हस्तक्षेप थांबवावा

नवी दिल्ली, दि. 14 - अर्थमंत्रालयाने रिझर्व्ह बँकेच्या कारभारात चालू असलेला हस्तक्षेप ताबोडतोब थांबवावा, अशी मागणी  रिझर्व्ह बँकेच्या   कर्मचार्‍यांनी केली आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या कर्मचार्‍यांकडून गर्व्हनर उर्जित पटेल यांना पत्र पाठविण्यात आले होते.
या पत्रात मोदी सरकारच्या नोटा रद्दसह इतर निर्णयांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून सरकारचे निर्णय हे रिझर्व्ह बँकेची स्वायत्ततेवर अतिक्रमण  करणारे असल्याचे या नमूद केले आहे. पटेल यांनी बँकेची स्वायत्तता राखण्यासाठी  योग्य ती  पावले उचलावीत. अर्थमंत्रालय गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करत  आहे, हा हस्तक्षेप कर्मचारी व अधिकार्‍यांसाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे हा हस्तक्षेप तातडीने थांबविण्यात यावा, असेही  पत्रात म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेला अडचणीत आणल्यानंतर अर्थ मंत्रालयाकडून बँकेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही  अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. अशा  हालचाली यापुढे सहन केल्या जाणार नाहीत , असा इशारा रिझर्व्ह बँकेच्या कर्मचार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे आता उर्जित पटेल यावर काय भूमिका घेणार, याकडे  लक्ष लागले आहे.
रिझर्व्ह बँकेतील चलन साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून संयुक्त सचिवाची नेमणूक होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचार्‍यांच्या  संघटनेने उर्जित पटेल यांना हे पत्र पाठविले आहे.