Breaking News

महापालिका निवडणुकीत कुणाचाही मुलाहिजा न करता कठोर कारवाई करणार ः पोलीस उपायुक्त

पुणे, दि. 15 - ’पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याने मतदान  केंद्राची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पोलीस बळ जास्त लागणार असून पोलीस आयुक्तलायाकडे अधिक कुमक मागविण्यात येणार आहे. या निवडणुकीत  कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करू, पक्षपात होणार नाही. निर्भय आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडू, अशी ग्वाही परिमंडळ तीनचे  नवनियुक्त पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांची नुकतीच पुण्यात बदली झाली आहे. त्यांच्या जागी गणेश शिंदे  यांची वर्णी लागली आहे.
त्यावेळी गणेश शिंदे म्हणाले की, परिमंडळ तीनच्या हद्दीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी, निगडी, सांगवी, वाकड, हिंजवडी, चतुश्रृं:गी ही नऊ पोलीस  ठाणे येत आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये शहरी भागाबरोबरच चिखली, दिघी, किवळे, चर्‍होली, मामुर्डी, पुनावळे, तळवडे, ताथवडे या ग्रामीण भागाचा समावेश  होतो. निवडणुकीत कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करू शकणार्‍या प्रवृत्तींना ठेचून काढण्यात येईल. कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणार्‍या कोणत्याही  घटकाची हयगय करणार नाही. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच गस्तही वाढविली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बिमोड  करण्यात येईल.
निवडणुकीमध्ये सर्व सरकारी संस्थाची मदत घेण्यात येणार आहे. नियमाचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणताही पक्षपात न करता आणि  कोणाच्याही दबावाला बळी न पडता निःपक्षपातीपने कारवाई केली जाईल. निवडणूक काळात उपलब्ध मनुष्यबळा बरोबर अधिकची कुमकही मागविण्यात येणार  असल्याचे उपायुक्त शिंदे यांनी सांगितले. निवडणुकी संदर्भात आमच्याकडे येणार्‍या सगळ्या तक्रारींचा निपटारा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.