Breaking News

नर्मदेच्या पाण्याला आईच्या दुधाइतकेच महत्व ः जगन्नाथ कुंटे

पुणे, दि. 15 - भारतभूमीत 85 लाख वर्षांपूर्वीपासून नर्मदा नदी अखंड वाहत आहे. हा नासाचा अहवाल आहे. नर्मदेच्या पाण्याला आईच्या दुधाइतकेच महत्व  आहे. नर्मदा परिक्रमेला गेल्यानंतर तिनेच मला सांभाळले.
 परिक्रमा ही सद्गुरु आणि नर्मदा माईच्या आज्ञेनेच होते. परिक्रमेतून वैराग्याची प्राप्ती होते, असे मत स्वामी अवधूतानंद उर्फ जगन्नाथ कुंटे यांनी चिंचवड येथे केले.
रोटरी क्लब ऑफ चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिशिर व्याख्यानमालेमध्ये ’नर्मदा परिक्रमा आणि अध्यात्म’ या विषयावर स्वामी  अवधूतानंद ऊर्फ कुंटे बोलत होते. यावेळी चिंचवड रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. अरविंद गोडसे, रो. मल्लिनाथ कलशेट्टी, रो. प्रसाद गणपुले आणि प्रकल्पप्रमुख डॉ.  शिल्पागौरी गणपुले आदी उपस्थित होते.
स्वामी अवधूतानंद उर्फ जगन्नाथ कुंटे यांचे ’नर्मदा परिक्रमा आणि अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी स्वतःचा नर्मदा  परिक्रमेचा अनुभव कथन केला. ते म्हणाले की, साधूसंतामध्ये वैराग्य हा मोठा गुण असतो.
कोणत्याही साधूसंतांनी कधीही कोणाकडे एक पैसा मागितलेला नाही आणि आज त्यांच्या नावाने लोक करोडो रुपयांची उलाढाल करतात. देशात अध्यात्माच्या  नावाखाली धंदा चालवला जात आहे.
आज बहुतांश मठाधीश आणि धर्माचे ठेकेदार अब्जाधिश आहेत. समोरच्याकडून मिळणार्‍या मदतीचे मोल महत्वाचे नसते तर तो व्यक्ती कोणत्या भावनेतून देतोय ते  महत्वाचे आहे. पाप केल्याने माणसाला महारोग होतो हा मोठा गैरसमज समाजात आहे. महारोग शरीराला झाला तर चालेल पण मनाला महारोग होऊ देऊ नका.
प्रपंचात सर्व भोग घेऊनही साधुसारखे विरक्त रहावे लागते. तुकाराम महाराजांनीही प्रपंच आणि परमार्थ दोन्ही केले. मानले तर सुख, नाही मानले तर दुःख आहे.  नामस्मरण, साधना या गोष्टी मनुष्याला संसारात तारणार आहेत. अनेक आध्यात्मिक ठिकाणी का म्हणून विचारायचे नाही, असे सांगितले जाते. मात्र, सर्व  गुरूचरितत्रामध्ये प्रश्‍न विचारा, असे सांगितले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी आध्यात्मावर आधारित श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना कुंटे यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. शिल्पागौरी गणपुले  यांनी केले.