Breaking News

सारडा महाविद्यालयात जिल्हास्तरीय प्राध्यापक उद्बोधन वर्ग संपन्न

अहमदनगर, दि 17 - जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी तसेच शासनाच्या परिपत्रका नुसार बदललेली परिक्षा  पद्धतीबाबत प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण उपसंचालक पुणे विभागाच्यावतीने नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयात दोन दिवसांचे उद्बोधन वर्गाचे  आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या सहाय्यक शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत यांच्या हस्ते उद्बोधन वर्गाचे उद्घाटन झाले. जिल्ह्यातील सर्व  महाविद्यालयातील विज्ञान, कला व वाणिज्य शाखेचे सुमारे 1 हजारहून अधिक प्राध्यापक या उद्बोधन वर्गास उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी उपसंचालिका  मिनाक्षी राऊत यांचा पेमराज सारडा महाविद्यालयाच्यावतीने उपप्राचार्या सुजाता काळे यांनी सत्कार केला. यावेळी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा,  महाविद्यालयाचे चेअरमन अ‍ॅड.अनंत फडणीस, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, प्रा.माणिक विधाते, प्रा.भाऊसाहेब कचरे, प्रा.जर्‍हाड, प्रा.खाजेकर आदि प्राध्यापक  संघटनेचे सदस्य उपस्थित होते. या उद्बोधन वर्गात पुण्यासह विविध जिल्ह्यातील विविध तज्ञ मार्गदर्शकांनी प्राध्यापकांना विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता  वाढीसाठी बहुमोल मार्गदर्शन केले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना उपसंचालिका मिनाक्षी राऊत म्हणाल्या, पुण्यामध्ये सर्वप्रथम प्राध्यापकांकरीता उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या  उद्बोधन वर्गाचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे पुणे विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्याने उद्बोधन वर्गाचे आयोजन करत आहोत. पारंपारिक  शिक्षण पद्धती आता बदलत आहे, त्यामुळे काळानुरुप शिक्षकांनीही अपडेट राहणे आवश्यक आहे. सर्वप्राध्यापकांनी स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे.  पुर्वीच्या काळी तुम्ही एम.ए.,बी.एड्.चे शिक्षण घेऊन पदवी मिळविली आहे. तरीही आता आधुनिक शिक्षण घेणे प्राध्यापकवर्गाकरीता आवश्यक झाले आहे.