Breaking News

भारतीय टायगर फोर्सच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

। जात पंचायत विरोधी कायद्याद्वारे खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांची सखोल चौकशीची मागणी 

अहमदनगर, दि 17 - भटक्या समाजातील नंदीवाले जातीच्या सामाजिक कार्यकर्त्यांवर पुर्ववैमनस्यातून जात पंचायत विरोधी कायद्याचा गैरवापर करुन दाखल  केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ भारतीय टायगर फोर्सच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. खोटे गुन्हे दाखल करणार्यांची सखोल  चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली.
मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चास प्रारंभ करण्यात आला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण  यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चामध्ये अशोक गायकवाड, शहराध्यक्ष योगेश गुंजाळ, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मिसाळ, स्वरुपचंद गायकवाड, संजू फुलमाळे,  रावसाहेब जाधव, पप्पू बोडे, नागेश शिंदे आदिंसह समाज बांधव मोठ्या सख्येने सहभागी झाले होते. माळीवाडा, पंचपीर चावडी, जुना बाजार या मार्गावरुन मोर्चा  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पारंपारिक वाद्य व घोषणांनी परिसर दणानला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या मांडून झालेल्या द्वार  सभेत प्रमुख नेत्यांची भाषणे झाली.
जिल्ह्यात भटक्या समाजातील नंदीवाले ही जमात अनेक गावात वास्तव्य करत आहे. पुर्वी उदर निर्वाहासाठी नंदीबैल घेवून गावोगावी फिरणारी ही जमात  अलीकडच्या काळात गावोगावी स्थिरावली आहे. तसेच या जमातीमध्ये अंर्तगत पोटजाती आहे. शासनाने केलेल्या जात पंचायती विरोधी कायद्याचा गैरवापर करुन  ढोकराई (ता.श्रीगोंदा) व पारेगांव (ता.संगमनेर) येथील दोन कुटुंबानी काही वर्षापुर्वी जातीतील काही कुटुंबाबरोबर झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी पुर्व  वैमनस्यातून काही सामाजिक संघटनांना हताशी धरुन समाजातील काही कार्यकर्त्यांवर जात पंचायत विरोधी कायद्यान्वये खोटे गुन्हे दाखल केले आहे.
या गुन्ह्यामुळे नंदीवाले समाजात भितीचे वातावरण असून, गुन्हे दाखल करणारे या कायद्याचा गैरवापर करुन समाजातील एकाऐकाला वठणीवर आनू, आमच्या  पायावर नाक घासायला लावू अशी भाषा वापरत आहे. यामुळे समाजात त्यांच्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. खोटे गुन्हे दाखल करणारे  तालुक्या-तालुक्यांमध्ये नातेवाईकांना हाताशी धरुन आणखी गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे. हा समाज अशिक्षित असल्याने त्यांचा गैरफायदा काही  संघटना घेवून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना  देण्यात आले.