Breaking News

राजकारणातील लढाई कमरेखाली नेण्याचे काम रामराजेंचे : आ. गोरे

सातारा, दि. 14 (प्रतिनिधी) : राजकारणातील नितीमत्ता सोडून चाललेले राजकारण यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्याला शोभणारे नाही. लढाई कमरेच्या खाली  जावू नये, ही इच्छा होती, राजकारणातील लढाई कमरेच्या खाली नेण्याचे काम रामराजेंनी केली आहे. नितीमुल्ये सोडल्यानंतरची लढाई काय असते ते रामराजेंना  दाखवावी लागेल, असा सज्जड दम माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, महिलेच्या विनयभंगप्रकरणी अटकेत असलेले  माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची न्यायालयाने गुरुवारी 25 हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली आहे.  
आमदार गोरे म्हणाले, गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत मी लोकशाही टिकविण्याचे काम केले. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळाला. त्यामुळे  प्रस्थापितांना धक्के बसू लागले होते. जिल्हा बँक, विधानसभा, जिल्हा परिषदेतील उलथापालथ तसेच विधान परिषदेत राष्ट्रवादीचा झालेला पराभव हे आता लसू  लागले आहे. त्यामुळे आपणास थोपविण्यासाठी कमरेखालील लढाईचा मार्ग रामराजेंनी निवडला. विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शेखर गोरे, रामराजे,  तसेच खंडणी मागण्यासाठी आलेले प्रदीप जाधव व विवेकानंद सावंत हे फिर्यादीच्या वारंवार संपर्कात होते. रामराजे राज्याच्या सर्वोच्च पदावर काम करत आहेत.  मात्र, त्यांनी माझ्याबाबतचा समाजातील माता-भगीनींचा विश्‍वास उडविण्यासाठी कट रचला. आपण कोणाच्याही खासगी आयुष्यात ढवळा-ढवळ केली नाही.  राजकारणाचाच भाग म्हणून सांगतो आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रकरणात मी काहीही करू शकत होतो. मात्र, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करायचे, असा  मी विचार करतो. कोणाच्याही असाह्यतेचा फायदा घेऊन काहीही करू नये, यातील सत्य लवकरच बाहेर येईल. ही केस निर्माण करण्यापासून ते जामीन मिळू नये  म्हणून प्रलंबित असलेल्या गुन्हांची खोटी यादी न्यायालयात सादर करण्यासाठी आपल्या गैरपदाचा वापर केला असल्याचे गोरे यांनी सांगितले.
आमदार गोरे यांनी महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा सुमारे दीड महिन्यापूर्वी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर आ. गोरे यांनी  न्यायालयात धाव घेऊन तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळविला होता. त्या अर्जाची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी  उच्च न्यायालयात धाव घेतली. या ठिकाणी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. शहर पोलीस ठाण्यात ते स्वत: हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक  केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. ही मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर  करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या तपासकार्यात सहकार्य करणे आणि 25 हजारांच्या जातमुचलक्यावर आमदार गोरे यांची न्यायालयाने मुक्तता केली.