Breaking News

मुद्रा योजनेसाठी बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे 20 रोजी शिबीर : अहिलाजी थोरात

सातारा, दि. 14 (प्रतिनिधी) : मुद्रा बँक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातारा जिल्ह्याची अग्रणी बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे 20 जानेवारी रोजी या  योजनेसाठी जिल्ह्यातील 62 शाखांमध्ये दुपारच्या कालावधीत विशेष शिबीर आयोजित केले आहे. तसेच 1 ते 7 फेब्रुवारी यादरम्यान मुद्रा सप्ताह आयोजित केला  असल्याची माहिती अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात यांनी दिली.
थोरात म्हणाले, जिल्ह्याची अग्रणी बँक असणारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे, या विशेष शिबीराचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील  सर्व शाखांमार्फत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना 100 कोटीचे कर्ज वितरीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी 20 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 6 या  कालावधीत इच्छुक लाभार्थ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा. या शिबीरात त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच अर्ज  स्वीकारण्यात येतील. परिपूर्ण भरलेले कर्जासाठीचे अर्ज स्वीकारल्यानंतर इच्छुक लाभार्थ्यांनी आवक क्रमांक घेण्यास विसरु नये. जेणेकरुन याबाबतची माहिती  मुख्य कार्यालयास मिळू शकेल. शेतीआधिारित व्यवसायासाठी यामध्ये कर्ज देण्यात येईल. 20 तारखेला होणार्‍या शिबीरात कर्ज मागणी अर्ज घेवून इच्छुक  लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावा. 27 जानेवारीपर्यंत हे अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर पात्र लाभार्थ्याला 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यानच्या  मुद्रा सप्ताहात वितरण केले जाईल. 8.95 हा व्याजदर असून या योजनेंतर्गत अधिकाधिक इच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घेवून व्यवसाय निर्मिती, व्यवसाय वृध्दी  करावी, असे आवाहन  थोरात यांनी केले आहे.