Breaking News

रस्ते सुरक्षा ही सामुहिक जबाबदारी - जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल

जळगाव, दि. 14 - रस्ते सुरक्षा हा सार्वजनिक जीवनाशी निगडीत प्रश्‍न आहे. रस्ते सुरक्षेसाठी परिवहन, पोलीस यंत्रणा या विविध उपाययोजनांची  अंमलबजावणी करीत असतात. मात्र रस्ते सुरक्षा ही सामुहिक जबाबदारी असल्याने त्यात सर्व नागरिक, वाहन चालक- मालक यांनीही सहभागी व्हावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले.
येथील शहर वाहतुक पोलीस शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियान 2017 चे आयोजन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले  होते. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, उपवनसंरक्षक जळगाव आदर्शकुमार  रेड्डी, जिल्हा सरकारी वकीलड.केतन ढाके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, परीविक्षाधिन अधिकारी सचिन ओम्बासे, निलोत्पल, पोलीस  उपअधिक्षक सचिन सांगळे, महारू पाटील, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अग्रवाल म्हणाल्या की, रस्ते सुरक्षा उपाययोजनांसाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित होते. तालुक्याला कॅम्प आयोजित करुन लायसेन्स  देण्यात येतील. वाहन चालविण्याचे परवाने देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन ही प्रक्रिया अधिक बिनचुक व काटेकोर करण्यात येत आहे,  असेही जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी सांगितले.
या सप्ताहानिमित्त रस्ते सुरक्षाविषयक पोस्टर्स व छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटनही जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात  आले. तसेच जनजागृतीपर व्हिडीओ चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत पाटील यांनी तर आभारप्रदर्शन अनिल देशमुख यांनी  केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद केदारे यांनी केले. या कार्यक्रमास नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मान्यवर, शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते.