Breaking News

मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेचं काम यावर्षी सुरु होणार : गडकरी

नवी दिल्ली, दि. 06 - मुंबई-बडोदा या 400 किमी लांबीच्या एक्सप्रेस वेचं काम यावर्षी सुरु होणार असल्याची माहिती आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिल्लीत दिली. आपल्या खात्यात गेल्या अडीच वर्षात झालेल्या कामांची माहिती देण्यासाठी गडकरींनी आज पत्रकार परिषद घेतली.
गेल्या अडीच वर्षात 4 लाख 60 हजार कोटींची कामे झाल्याचा, 14 हजार 390 किमी लांबीचे रस्ते बांधून झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. देशात 10  एक्सप्रेस वे बांधण्याचं लक्ष असून यावर्षी त्यात मुंबई-बडोदा या एक्सप्रेस वेचं काम सुरु होईल असं त्यांनी सांगितलं.
रस्ते अपघात कमी करण्यासाठी एफएम रेडिओच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करण्यात येतं आहे. त्या अंतर्गत पुणे-मुंबई, नागपूर-रायपूरसह अन्य महामार्गांवर अशा पद्धतीनं एफएम रेडिओ सुरु करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी रेल्वे, बस, विमान, जलवाहतुकीची सेवा मिळावी आणि वारंवार तिकीट बदलण्याचा त्रास होऊ नये यासाठी काही शहरांत एकात्मिक वाहतूक केंद्र उभारण्याबाबत अभ्यास सुरु आहे. वाराणसी आणि नागपूर या दोन शहरांचा त्यासाठी अभ्यास झाल्याचं गडकरींनी सांगितलं.