उत्तरप्रदेशातील राजकीय संदोपसुंदी!
दि. 03, डिसेंबर - उत्तरप्रदेश मध्ये होणार्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षात जोरदार कलहातून रोज नवनवीन निर्णय घेतले जात आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषक अंदाज बांधू शकणार नाही, इतके संभ्रम समाजवादी पक्षाने निर्माण केले आहे. मात्र या संदोपसुंदीमध्ये उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकांच्या वेळीस सर्वच लक्ष आपल्यावर केंद्रित कसे राहिल, हा समाजवादी पक्षाचा छुपा हेतु असु शकतो. जो बराच अंशी यशस्वी झाला आहे. समाजवादी पक्षातील यादवी जर खरोखरच विकोपाला गेली असती, तर मुख्यमंत्री यांचे निलंबन, पुन्हा घरवावसी असे प्रकार घडले नसते. मात्र आता हा त्यांचा आपल्या रणनितीचा आणि पुत्रप्रेमाचाच भाग असल्याचे एव्हाणा दिसू लागले आहे. मग ते पक्षाचे चिन्ह सायकल साठी निवडणूक आयोगाच्या दारात गेल्यामुळे, यांची यादवी ही लुटुपूटुची नसून खरी असल्याचा भास निर्माण होत असला, तरी ही लढाई देखील लवकरच संपुष्टात येईल. परवाच रामगोपाल यादव आणि अखिलेश यादव यांचे सहा वर्षांचे निलंबन मागे घेतल्यानंतर दुसर्याच दिवशी असंविधानिकरित्या पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलविल्याबद्दल मुलायमसिंह यांनी त्यांचे पाच वर्षांसाठी निलंबन केले. तसेच पुन्हा समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन 5 जानेवारीला बोलविण्यात येणार आहे. असे सुतोवाच समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशातील राजकीय गोंधळ कधी संपणार, असा प्रश्न त्यांच्या विरोधकांना निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे निवडणूकांमधील चित्र स्पष्ट झाल्यांनतरच भाजपा, बसपासह इतर विरोधी पक्षांना उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकांची रणनिती तयार करता येणार नाही, हे स्पष्ट आहे. याचाच अर्थ विरोधकांना हातावर हात ठेवून वाट बघण्यासाठीच ही यादवी मुद्दामहुन तर तयार केली नाही ना? असा संशय आता निर्माण होवू लागला आहे. समाजवादी पक्षाची पुन्हा उत्तरप्रदेशवर सत्ता काबीज करण्यासाठी रचलेले हा कलह आहे का? यात विरोधक अलगद सापडले का? विरोधकांना निष्प्रभ करण्यासाठी हा कलहाचा देखावा निर्माण केलेला आहे का? असे अनेक प्रश्न आता या यादवी वर निर्माण होवू लागले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबातील कलह अद्याप संपण्याच्या मार्गावर नाही. यापूर्वी मुलायमसिंहाच्या अनुपस्थितीमध्ये अखिलेश यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड. प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांना पदावरून हटविण्याचा निर्णय, तर, समाजवादी पक्षातील कलहाला जबाबदार धरण्यात येणार्या अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी, मुलायमसिंह यांना पक्षाचे मार्गदर्शक बनवणे, आणि पुन्हा मुलायमसिंहाकडून 5 जानेवारीला पक्षाचे अधिकृत राष्ट्रीय अधिवेशनाची घोषणा करणे, हा प्रकार सर्वच राजकीय तज्ञांना, आणि मुख्यत विरोधकांना गोंधळवून टाकण्यासाठी, आणि त्यांना वेट अॅण्ड वॉच च्या भूमीकेवर ठेवून आपण आपली कार्यसिध्दी करायची असाच समाजवादी पक्षाच्या रणनितीचा भाग सध्या तरी दिसून येत आहे. मुलायमसिंह आपल्या पुत्राला दूर करणार नाही, तर पुन्हा सत्ता मिळवून ती अखिलेश च्या हाती सोपविण्यासाठी सुरू झालेला हा संघर्ष असल्याचे काही अंशी तरी दिसत आहे. समाजवादी पक्षात जर दोन गट निर्माण झालेच तर, त्याचा फायदा निवडणूकांमध्ये करून घ्यायचा आणि सत्ता मिळाल्यास पुन्हा दोन्ही गट एकत्र येतील. येणार्या काही दिवसात उत्तरप्रदेशातील राजकीय चित्र स्पष्ट होईलच. मात्र तोपर्यंत राजकीय यादवी मध्ये सर्व लक्ष अखिलेश भोवती आणि प्रामुख्याने समाजवादी पक्षाभोवती केंद्रीत करण्यात मुलायमसिंह यशस्वी झाले असणार, आणि हीच त्यांची उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकांपूर्वीची रणनितीचा भाग आहे, जो निवडणूकांमध्ये त्यांना मदतच करणार आहे.