Breaking News

मी जन्मजात काँग्रेसी विचारसरणीचाच : नवज्योत सिंग सिद्धू

नवी दिल्ली, दि. 16 - मी जन्मापासूनच काँग्रेसी विचारसरणीचा माणूस आहे. काँग्रेस पक्षात मी केलेला प्रवेश म्हणजे माझी घरवापसीच आहे, ’’  असे प्रतिपादन नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज येथे केले. रविवारी सिद्धू यांनी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर प्रथमच  त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
‘सिद्धूसाठी पक्ष हा मातेसमान होता, असे अनेकांचे मत आहे. पण काहीवेळा माता ही कैकेयीसारखीही वागते. आणि तिचे कान भरणारी पंजाबमधील मंथरा कोण  हे सा-यांनाच माहिती आहे, अशा शब्दात सिद्धू यांनी आपली भाजपबद्दलची नाराजी व्यक्त केली.
सिद्धू यांनी आज भाजपसह अकाली दल पक्षावरही टिका केली. पंजाबच्या निवणुकीसाठी निवड करण्याची वेळ आली, तेव्हा भाजपने मित्रपक्षाची निवड केली, तर  मी पंजाबची निवड केली, असे म्हणत काँग्रेसच पंजाबचा विकास करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे स्थानिक नेते अमरिंदर सिंग यांच्याबरोबरच्या मतभेदावरही सिद्धू यांनी भाष्य केले. ‘जर चर्चेने दोन देशांमध्ये तोडगा काढता येतो, तर आम्हा दोघांच्यातही  तोडगा निघू शकतो, असे सिद्धू म्हणाले.
‘पंजाबचा मला अभिमान आहे. पण बादल पिता पुत्रांच्या भ्रष्ट कारभारामुळे   या राज्याची प्रतिमा मलीन झाली आहे. पंजाबला ड्रग  माफिया आणि नेतेमंडळीच्या  भ्रष्टाचारामुळेच अंमली पदार्थांनी विळखा घातला आहे . काँग्रेसची राज्यात सत्ता आली तर आम्ही ड्रग्समाफियांना राज्यातून हद्दपार करू, असे आश्‍वासन दिले.
‘पक्ष ज्या ठिकाणाहून सांगेल, तेथून मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. ही माझी वैयक्तिक लढाई नसून पंजाबच्या अस्तित्वाची व स्वाभिमानाची लढाई आहे’,  असेही सिद्धूने नमूद केले.