Breaking News

दिनदर्शिकेवरील छायाचित्रासाठी पंतप्रधानांची पूर्वपरवानगी घेतली नव्हती

नवी दिल्ली, दि. 16 - खादी ग्रामोद्योगच्या दिनदर्शिका आणि रोजनिशीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापण्यासंदर्भात पंतप्रधान  कार्यालयाकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र छापताना पंतप्रधान कार्यालयाची परवानगी घेण्यात आली नव्हती,अशी माहितीही  समोर आली आहे. या प्रकरणी सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालयाकडून खुलासा मागवण्यात आला आहे.
खादी ग्रामोद्योगाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशींवर महात्मा गांधी यांचे चरख्यावर सूत कातत असलेले छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र  झळकले. यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. या प्रकारावर पंतप्रधान कार्यालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी रिलायन्स जिओ आणि  मोबाईल वॉलेट कंपनी ’पेटीएम’च्या जाहिरातींमध्येही पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र छापताना पंतप्रधान कार्यालयाची मंजूरी घेण्यात आली नव्हती.
खादी ग्रामोद्योगाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशींवर महात्मा गांधींचे  छायाचित्र असते. पण यापूर्वीही गांधींऐवजी सर्वसामान्य व्यक्तींच्या छायाचित्राचा वापर झाला  होता, असे अधिकार्‍यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान मोदी यांनी महिलांना  सुमारे 500 चरख्यांचे वितरण केले होते. त्यावेळीच दिनदर्शिका  आणि रोजनिशीवर मोदींच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला होता, असे सांगण्यात येत आहे.